बालरोग तज्ज्ञांनी आपल्या ज्ञानाचा फायदा संभाव्य रुग्णांसाठी करावा : मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:05+5:302021-05-29T04:24:05+5:30
रत्नागिरी : कोविडची दुसरी लाट सुरू असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. या लाटेत बालकांना धोका अधिक आहे. ...
रत्नागिरी : कोविडची दुसरी लाट सुरू असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. या लाटेत बालकांना धोका अधिक आहे. त्यामुळे सर्व बालरोग तज्ज्ञांनी आपल्या ज्ञानाचा फायदा संभाव्य रुग्णांसाठी करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन याअनुषंगाने जिल्ह्यात बालरुग्ण कृती दल (टास्क फोर्स) तयार करण्यात आले आहे. या कृती दलाची पहिली बैठक गुरुवारी सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली, यावेळी मिश्रा बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.
बालरुग्णांची व्याख्या आता नव्याने करण्यात आली. कोरोनासंदर्भातील उपचारासाठी ० ते १८ वर्षे वय असणाऱ्या सर्वांना बालक म्हणून उपचार करावेत, असे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्यस्तरावर देखील १४ तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेले कृती दल स्थापन करण्यात आले आहे.
शहरात स्वस्तिक रुग्णालय येथे कोविडबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहे. तसेच लवकरच सुरू होणाऱ्या महिला रुग्णालयातील विस्तारित २०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात बालकांसाठी ५ खाटांचा अतिदक्षता कक्ष असणार आहे. एका बाजूला कोविडची तिसरी लाट येण्याची वर्तविण्यात आलेली शक्यता आणि आठवडाभरात सुरू होणारा पावसाळा, या पार्श्वभूमीवर यापुढे काम होणार आहे. पावसाळ्यात पसरणारे इतर साथरोग आणि कोविडचे वातावरण यात बालरोग तज्ज्ञांची भूमिका मोलाची ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
या कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. एस. सामंत, विनया घाग (अध्यक्ष जिल्हा बालकल्याण समिती), प्रशांत दैठणकर (जिल्हा माहिती अधिकारी) हे सदस्य असणार आहेत. आर. जी. काटकर (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी) हे सदस्य सचिव, तर समृद्धी वीर (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) या समन्वयक आहेत.
तसेच डॉ. संदीप माने, डॉ. सतीश पाटील, डॉ. जयंतकुमार दाभोळे, डॉ. सूयार्थप्रकाश बळवंत, डॉ. विजय सूर्यगंध, एसएनसीयु बालरोगतज्ज्ञ डॉ. रोहित पाटील, डीईआयसी बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर, तसेच डॉ. योगीता चौधरी, डॉ. नीलेश शिंदे, डॉ. अनिरुध्द फडके, डॉ. शिवाजी साळुंखे, डॉ. यु. बी. चव्हाण, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. संजीव माने आदी खासगी बालरोगतज्ज्ञ हे समितीचे सदस्य आहेत.