शिपाई ते वॉचमन नोकरी करून मुलांना केले पदवीधर

By Admin | Published: October 2, 2016 11:23 PM2016-10-02T23:23:53+5:302016-10-02T23:23:53+5:30

सुनीता माने : पती निधनानंतर सांभाळला यशस्वी संसार

Peerants They Have Been Famed by Watchmen Jobs | शिपाई ते वॉचमन नोकरी करून मुलांना केले पदवीधर

शिपाई ते वॉचमन नोकरी करून मुलांना केले पदवीधर

googlenewsNext

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी
मुलं लहान असताना नवऱ्याचे निधन झाले. नवरा दूध विक्रीचा व्यवसाय करायचा. परंतु सासरच्या मंडळींनी साथ दिली नाही. केवळ राहण्यासाठी एक छोटीशी खोली दिली. मुलांच्या दुधासाठी हातात एक पैसा नव्हता. त्यामुळे खूपच निराशा होती. मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून घरकाम करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर शाळेत शिपाई म्हणून काम स्वीकारले. गेली २५ वर्षे शिपाई ते वॉचमनचे काम करीत असल्याचे सुनीता शंकर माने यांनी सांगितले.
सुनीता या कोल्हापूरच्या माहेरवाशीण! परंतु लग्नानंतर रत्नागिरीच्या सूनबाई झाल्या. शहरातील गवळीवाडा येथे राहात होत्या. पती दूग्ध व्यवसाय करीत असत. सासरचा मोठा गोतावळा होता. मोठा मुलगा तीन व लहान मुलगा एक वर्षाचा असताना नवऱ्याचे निधन झाले. सुनीता यांच्यावर मोठा आघात कोसळला. नवऱ्याच्या निधनानंतर दुग्ध व्यवसायाचा ताबा सासरच्या मंडळींनी घेतला. वडिलोपार्जित घरातील एक छोटी खोली सुनीताला देऊ केली. दोन मुलांना घेऊन सुनीता यांचा संसार छोट्याशा खोलीत सुरू झाला. मुले लहान असल्याने त्याचे दूध, खाऊ एकंदर रोजचा खर्च कसा भागवावा, ही भ्रांत होती. शेवटी जिद्दीने त्यांनी घरकाम करण्यास प्रारंभ केला. सकाळपासून सायंकाळपर्यंत एकापाठोपाठ एक अशा विविध घरातून धुणी - भांडी करणे, पोळ्या लाटणे अशी कामे करीत असत. काम केल्यावर कुणी जेवण दिले तर मुलांना त्या बांधून घेऊन येत असत. मिळणाऱ्या पैशातून दैनंदिन खर्च भागवत असत.
एक दिवस एम. एस. नाईक माध्यमिक शाळेत शिपाईची आवश्यकता असल्याचे कळले. तत्कालिन मुख्याध्यापिका पैगंबरवासीय सईदा नाईक यांना जाऊन त्या भेटल्या. मॅडमनी सुनीता यांची कहानी ऐकल्यावर तातडीने कामावर रूजू करून घेतले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुनीता शिपाई म्हणून काम करीत असत. त्यानंतर त्या काही घरातील घरकाम करीत असत. कालांतराने त्यांनी घरकाम सोडले. त्यांची कामातील उरक, शिस्तबध्दता व सचोटी यामुळे शाळेत सुनीता ‘मावशी’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. गेल्या २५ वर्षांत अनेक विद्यार्थी शाळेतून शिकून कर्तृत्त्ववान झाले तरी सुनीता मावशीबद्दलचा आदर सर्वांनाच आहे. अनेक विद्यार्थी शाळेत येतात, तेव्हा सुनीता मावशींची भेट घेतात, त्यांच्याशी बोलतात. माजी विद्यार्थ्यांची मुले आता शाळेत आहेत, आपल्या मुलांना ‘मावशी’ची ओळख प्रेमाने करून देतात, असे भावूक होऊन सुनीता मावशी सांगतात.
शिपाई ते वॉचमनपदी काम करताना चेअरमन महंमद सिद्दीक नाईक व पैगंबरवासीय सईदा नाईक यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले, खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले, हे सुनीता मावशींच्या बोलण्यातून वारंवार समोर येते. वयोमानानुसार डोकेदुखी, पाय सुजणे अशा व्याधी जडल्या आहेत. गेल्या ३० वर्षातील आठवणी लक्षात घेता जोपर्यंत काम करता येईल, तेवढे दिवस तरी आपण काम करू, असा सुनीता मावशींनी जणू पण केला आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, त्यामुळे मी आतापासून त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही, याच ठाम इच्छाशक्तीवर त्यांची अविरत वाटचाल सुरू आहे.
नोकरी सोडण्यास नकार
आईच्या कष्टाची जाण मुलांना आहे. दोन्ही मुलांना त्यांनी पदवीधर केले. त्यांची दोन्ही मुले रत्नागिरीत पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. मोठ्या मुलाचे त्यांनी मार्चमध्ये लग्न केले. सुनबाईसुध्दा पोलीस आहेत. मुलांनी आता घरदेखील बांधले आहे. आई आता नोकरी सोड, अशी विनवणी मुले करतात. परंतु ५६ वर्षीय सुनीतामावशी ठाम नकार देतात.
मावशींचा प्रेमळ धाक
वयोमानानुसार गेली काही वर्षे शिपाई म्हणून काम करणाऱ्या मावशींना शाळेने मुख्य प्रवेशव्दारात ‘वॉचमन’चे काम दिले आहे. वेळेवर शाळेत येण्याचा प्रेमळ धाक विद्यार्थ्यांना जणू सुनीतामावशीमुळे लागला आहे. आजही मावशी आपले काम नित्यनियमाने आणि प्रामाणिकपणे करत आहेत.

Web Title: Peerants They Have Been Famed by Watchmen Jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.