कचरा टाकणाऱ्यांना दंड; थुंकणाऱ्यांनाही लगाम
By admin | Published: May 2, 2016 09:59 PM2016-05-02T21:59:49+5:302016-05-03T00:34:33+5:30
रत्नागिरी नगर परिषद सभेत निर्णय : खासगी संस्थेला दिला जाणार मक्ता...
रत्नागिरी : शहरात पालिकेची कचरा संकलन व्यवस्था असतानाही कुंड्यांच्या बाहेर कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना आवाहन करूनही कोणताच फरक पडलेला नाही. तसेच रत्नागिरीत येणारे पर्यटक व नागरिक रस्त्यावर कचरा करतात तसेच थुंकतात. त्यामुळे यापुढे अशी कृती करताना जे कोणी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी खासगी संस्थेला मक्ता दिला जाणार आहे. १०० रुपये ते ५०० रुपयांपर्यंत दंडाची रक्कम ठरविण्यात आली असून, या निर्णयाला सोमवारी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. आता हा निर्णय मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शहरातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली तसेच अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच शहरातील नगर परिषद व्यायामशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली जाणार असून, यासाठी २ लाख निधी खर्चाला सभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी नगरसेवक अशोक मयेकर यांनी एवढा निधी कशासाठी? असा सवाल केला असता, या दोन वेगवेगळ्या स्पर्धा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शहरातील विश्वनगर येथील सर्व्हे नंबर १३५ मध्ये नगर भूमापन क्र. ८३ या जागेमधील ३० मीटर्स क्षेत्राला नगर भूमापनचा ८३/११ नंबर देण्यात आला आहे.
यातील एकूण क्षेत्र ३६१ चौरस मीटरचे असून, त्यातील २८० मीटर क्षेत्र हे रमेश पांडुरंग सावंत यांना देण्यास ३० मार्च २०१५च्या सभेत मान्यता देण्यात आली होती. या क्षेत्रातील पूर्ण जागेवर नाव लावण्याची मागणी सावंत यांनी केली होती. त्यानुसार संपूर्ण जागेवर त्यांचे नाव लावण्यास मंजुरी देण्यात आली.
शहरातील तोरणनाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्याबाबत चौकशीची मागणी नगरसेवक उमेश शेट्ये व अशोक मयेकर यांनी सभेत बोलताना केली. यावर सभागृहात काहीवेळ चर्चाही झाली. मात्र, या विषयाला नंतर हळूच बगल देण्यात आली.
रत्नागिरी नगर परिषद हद्दीमधील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात कार्यक्रम करणाऱ्यांकडून प्रति चौरसमीटर भाडे घेण्याचेही या सभेत निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)