राष्ट्रवादी संपविण्याचा विडा पक्षातीलच लोकांनी घेतलाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:29+5:302021-03-25T04:29:29+5:30
खेड : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्याचा विडा पक्षातीलच काही लोकांनी घेतला आहे, ही बाब गेल्या दीड वर्षांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे ...
खेड : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्याचा विडा पक्षातीलच काही लोकांनी घेतला आहे, ही बाब गेल्या दीड वर्षांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी नजरेसमोर आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आपण आपल्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्यासाेबत सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार व खाडीपट्ट्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड होत असताना राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली होती. ही निवड झाल्यानंतर दोनच दिवसात सुसेरी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य नफिसा परकार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्त्वावर टीकेची झोड उठवली.
त्या म्हणाल्या की, आमदार जाधव राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यावर त्यांच्या मुलासह सात जिल्हा परिषद सदस्य व तीन पंचायत समिती सदस्य खुलेआम शिवसेनेचे काम करत आहेत. सुमारे दीड वर्षांपूर्वी ही बाब आम्ही पुराव्यानिशी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली होती; परंतु थेट विक्रांत जाधव यांचे नाव या निवडणुकीसाठी सुचविण्यात आले. शिवसेनेचे खुलेआम समर्थन करणाऱ्या व राष्ट्रवादीच्या निष्ठावंत सदस्यांना त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदे देण्याचे काम जिल्ह्यातील पक्षाचे नेते शिवसेना नेत्यांच्या सूचनेवरून करीत असतील तर आपण अशा पक्षात राहू इच्छित नाही. जिल्ह्यातील पक्ष संपविण्याचे काम काही वरिष्ठ पदाधिकारी करीत आहेत, असा सणसणीत आरोप त्यांनी केला.
ही बाब आगामी काळात राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देऊ व त्यानंतर आपण व आपले कार्यकर्ते पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे देणार असल्याची घोषणा नफिसा परकार यांनी केली.
अंतर्गत नाराजी तीव्र
जिल्ह्यात एका बाजूला शिवसेना नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे, त्यांच्या मुलांचे उद्योग व्यवसाय बंद होतील, अशा पद्धतीने काम करत आहेत. आम्ही स्थानिक पातळीवर शिवसेनेशी संघर्ष करीत राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले होते; मात्र जिल्हा व तालुका पक्षश्रेष्ठी सोयीनुसार आमचा वापर करून घेत आले आहेत. यापुढे आम्ही तसे होऊ देणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे अंतर्गत नाराजी वाढली आहे. आगामी काळात त्याचा स्फोट होईल, असा इशारा इशमत परकार यांनी दिला.