मास्क न घालणारे लोक आता कारवाईच्या तोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 03:23 PM2020-10-16T15:23:05+5:302020-10-16T15:25:20+5:30

coronavirus, ratnagiri, mask, कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही मास्कसह हेल्मेट नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मास्कचा वापर नागरिकांच्या अंगवळणी पडला असला तरी शारीरिक अंतर राखण्याचा विसर पडत आहे. मास्कसक्ती असल्याने अनेक जण नाक तसेच तोंडावर मास्क न लावता केवळ गळ्यात अडकवून फिरत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे.

People without masks now face action | मास्क न घालणारे लोक आता कारवाईच्या तोंडी

मास्क न घालणारे लोक आता कारवाईच्या तोंडी

googlenewsNext
ठळक मुद्देमास्क न घालणारे लोक आता कारवाईच्या तोंडीमास्कची सक्ती अंगवळणी, मात्र सोशल डिस्टन्सिंगचा विसर

शोभना कांबळे

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही मास्कसह हेल्मेट नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मास्कचा वापर नागरिकांच्या अंगवळणी पडला असला तरी शारीरिक अंतर राखण्याचा विसर पडत आहे. मास्कसक्ती असल्याने अनेक जण नाक तसेच तोंडावर मास्क न लावता केवळ गळ्यात अडकवून फिरत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे.

ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची अधिकच धावपळ सुरू झाली. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन केले. याच दरम्यान जिल्ह्यातही अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली.

गणेशोत्सवासाठी नागरिक खरेदीसाठी गर्दी करू लागले. त्यामुळे संसर्ग अधिक वाढला. जिल्ह्यात या दोन महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. त्यामुळे कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये बेफिकीरी दिसून येताच प्रशासनाला नाईलाजाने कारवाई करण्याचा पवित्रा घ्यावा लागला.

त्यामुळे सप्टेंबर महिन्यात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. खरेदी करताना, शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी जाताना, बँकेत जाताना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले. तसेच या ठिकाणीही मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे फलकही लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मास्क लावणे अनिवार्य झाले.

रत्नागिरी नगरपरिषदेने शहरात पोलिसांच्या सहकार्याने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली. पोलिसांनीही मास्कसह हेल्मेट अशी दुहेरी कारवाईचा बडगा उगारताच दुचाकीस्वारांनी तर या कारवाईचा धसकाच घेतला.

मास्कच्या सक्तीमुळे आता नागरिक मास्क न विसरता वापरू लागले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे दिसत असले तरी मृत्यू अजूनही होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मास्क, सॅनिटायझर याबरोबरच शारीरिक अंतर राखण्याची शिस्त बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

दोन लाखांचा दंड


रत्नागिरी नगर परिषद आणि पोलीस विभाग यांच्या सहकार्याने सप्टेंबर महिन्यात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या या कारवाईत मास्क न लावलेल्या ४०९ जणांकडून २ लाख ४ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गांभीर्य नाही

काही नागरिकांना अजुनही कोरोनाबाबतचे गांभीर्य दिसत नाही. अनेक लोकांना मास्क नाक आणि तोंड झाकण्यासाठी असतो, हेच माहीत नाही. त्यामुळे काही जण मास्क नाक व तोंड उघडे ठेवून लावतात. काहीजण मास्क हनुवटीला लावून तर काही गळ्यात घालून फिरत असतात.

Web Title: People without masks now face action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.