आधुनिक तंत्रज्ञानातून बारमाही शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:11+5:302021-06-24T04:22:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मूळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असतानाच निव्वळ शेतीची आवड म्हणून चिपळूण तालुक्यातील पोफळी गावचे संजय ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मूळ बांधकाम क्षेत्रात कार्यरत असतानाच निव्वळ शेतीची आवड म्हणून चिपळूण तालुक्यातील पोफळी गावचे संजय बामणे गेली १२ ते १३ वर्षे बारमाही शेती करत आहेत. सेंद्रिय शेतीवर त्यांचा विशेष भर आहे. पडीक जमीन लागवडीखाली आणून शरिराला अपाय होणार नाही, अशी शेती उत्पादने ते घेत आहेत. उत्पादनाचा दर्जाही उत्कृष्ट असल्याने विक्रीही चांगली होते.
पावसाळ्यात सहा एकर क्षेत्रावर भात लागवड करत असून, विविध प्रकारचे वाण लावून उत्पादन घेत आहेत. वाडा कोलम, चिंटू, अंकूरपूजा या वाणांची लागवड त्यांनी केली आहे. दर्जेदार तांदूळ विक्री ते करत असून, त्यासाठी त्यांना दरही चांगला प्राप्त होत आहे. भात काढल्यानंतर दोन एकर क्षेत्रावर झेंडू लागवड करत आहेत. कऱ्हाड येथील नर्सरीतून रोपे आणून लागवड करतात. दसरा, दीपावली, मार्गशीर्ष महिन्यात त्यांच्याकडील झेंडू संपतो. याशिवाय उर्वरित क्षेत्रात पावटा, चवळी, कोबी, दुधीभोपळा तसेच झुकीनी आदी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहेत. त्यानंतर सहा एकर क्षेत्रावर ते कलिंगड लागवड करत आहेत. आतून लाल व बाहेरून राखाडी, आतून बाहेरून पिवळे, आतून पिवळे व बाहेरून हिरवे अशा वाणांची कलिंगड लागवड ते करत असून, एकरी १३ ते १४ टन उत्पादन त्यांना प्राप्त होत आहे. दर्जेदार मालाचा खप हातोहात होतो.
शेती करताना व्यावसायिक दृष्टीकोन असावा, शिवाय जमीन ओसाड ठेवण्यापेक्षा लागवडीखाली यावी. कोकणच्या लाल मातीत विविध प्रकारचे उत्पादन घेता येते, पिके घेत असताना, कोणत्याही प्रकारचा शरिराला अपाय होणार नाही, याची काळजी घेतली तर उत्पादनांना दर चांगलाच प्राप्त होतो. योग्य नियोजन मात्र गरजेचे आहे.
- संजय बामणे, पोफळी
मुंबईत विक्री
गतवर्षी ३८ पोती तांदूळ बामणे यांनी ५५ रूपये किलो दराने विकला.
कलिंगड विक्रीसाठी मुंबईत स्टाॅल लावण्यात येतात.
विविध प्रकारचे वाण लावत असून, शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन घेतात.
कोबी, दुधीभोपळा, झुकीनी, आंबा, काजू पिकाचे उत्पादन घेत असतानाच दर्जा मात्र जपला आहे.
झुकीनी लागवड
बामणे यांनी वीस गुंठे क्षेत्रावर झुकीनी लागवड केली होती. कोकणच्या लाल मातीत चांगले उत्पन्न त्यांना प्राप्त झाले. दिवसाला ७५० किलो झुकीनी काढली जात होती. सलग दोन महिने उत्पन्न काढण्यात आले. मात्र, विक्रीसाठी मुंबईत पाठवावी लागत असे. त्यामुळे त्याचे पॅकिंग व वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी झुकीनी लागवड करणे बंद केली आहे. बामणे यांनी २५० आंबा, ५०० काजूंची लागवड केली आहे. वाळलेल्या बी पेक्षा ओल्या काजूगरांची विक्री करत असून, त्याला चांगला दर प्राप्त होतो, असा त्यांचा दावा आहे. कलिंगडाचे विविध प्रकार ते लागवड करून उत्पादन घेत आहेत. मुंबईत कलिंगडाचा खप चांगला होत असल्याचे त्यांनी सांगितले.