पर्ससीन नेट मासेमारी बंद, किनाऱ्यावरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प; खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 02:23 PM2023-01-02T14:23:24+5:302023-01-02T14:23:46+5:30

नौकामालक चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांकडून काढलेली लाखोंची उसनवारी कशी भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

Perscene net fishing stopped, the turnover of crores of rupees on the coast stopped | पर्ससीन नेट मासेमारी बंद, किनाऱ्यावरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प; खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड

पर्ससीन नेट मासेमारी बंद, किनाऱ्यावरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प; खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड

googlenewsNext

रत्नागिरी : चार महिन्याच्या मासेमारीनंतर पर्ससीन नेट मासेमारी शासनाच्या आदेशाप्रमाणे १ जानेवारीपासून बंद झाली आहे. यामुळे सुमारे नऊ हजार खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत. पर्ससीन नेट मासेमारी बंद झाल्याने जिल्ह्याच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यात २८८ पर्ससीन नेट नौका असून, त्यावर सुमारे नऊ हजार खलाशी काम करतात. शासन निर्णयानुसार मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून पर्ससीन नेट मासेमारीला ३१ डिसेंबरपर्यंतच मासेमारी करता येते. त्यानंतर बंदी कालावधीमुळे या नौका किनारपट्टीला नांगरावर ठेवाव्या लागतात. त्याप्रमाणे प्रशासनाकडून कारवाई टाळण्यासाठी बहुतांश नौका किनाऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नौकांवर काम करणाऱ्या खलाशांना काहीही काम राहिलेले नसल्याने ते बेरोजगार होऊन माघारी परतले आहेत. तर नौकामालक चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांकडून काढलेली लाखोंची उसनवारी कशी भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

इतर व्यवसायांवर परिणाम

पर्ससीन नेट मासेमारीमुळे बंदरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरु असते. मात्र, ही मासेमारी करण्यास १ जानेवारीपासून बंदी घालण्यात आलेली असल्याने याच्याशी निगडीत इतर व्यवसायही ठप्प झाले आहेत. त्यामध्ये मासे विक्रेत्या महिला, डिझेलची उचल थांबली, हॉटेल्स व्यवसाय, टेम्पो/रिक्षा व्यवसाय, बर्फ कारखाने, माशांची निर्यातवरही पर्ससीन नेट मासेमारी बंदचा दुष्परिणाम झालेला आहे.

परराज्यातील खलाशी माघारी

स्थानिक खलाशांची वानवा असल्याने पर्ससीननेट व इतर मासेमारी नौकांवर परराज्यातील खलाशांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे ९० टक्के खलाशी अन्य राज्यातील आहेत. तसेच सीमेपलीकडच्या नेपाळमधील खलाशी या नौकांवर काम करतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिसा, गुजरातमधील उमरगा तसेच अन्य राज्यातील खलाशांचा भरणा या नौकांवर असतो. अनेकदा हे खलाशी पळून जाण्याचे प्रकार सुरू असतात. त्यावेळी नौकामालकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

जाळी विणकाम करणारे अडचणीत

पर्ससीन नौकेवर सुमारे ३० ते ३५ खलाशी काम करतात. त्यांच्याशिवाय या नौकामालकांना जाळी विणकाम करणाऱ्या कामगारांवही नुकसानीच्या वेळी काम करावे लागते. अनेकदा मासेमारी करताना जाळी फाटतात. अशा वेळी सुमारे ५०० ते ७०० रुपये रोजंदारी देऊन जाळी दुरुस्ती करण्याचे काम केले जाते. हे काम जिल्ह्यातील शेकडो लोक करतात. पर्ससीन नेट मासेमारी बंदीमुळे त्यांच्या पोटावरही पाय आलेला आहे. त्यांचा कमाईचा मार्गच बंद झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत.

Web Title: Perscene net fishing stopped, the turnover of crores of rupees on the coast stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.