पेट्रोलपंपाची जागा ताब्यात घेणार?
By admin | Published: October 27, 2014 09:03 PM2014-10-27T21:03:54+5:302014-10-27T23:33:39+5:30
करार संपला : नगरपरिषद प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
चिपळूण : जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पेट्रोल, डिझेलची गरज ओळखून चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे ९९ वर्षांच्या करारावर मार्कंडी येथील जागा एका पेट्रोल पंपासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. करार संपल्यानंतर २०११ मध्ये तीन वर्षांच्या करार वाढवून देण्यात आला होता. हा करारही ३० सप्टेंबर रोजी संपल्याने संबंधित जागा ताब्यात घेण्याबाबत हालचालीना वेग आला आहे.
नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अधिक भर पडावी, या हेतूने नगर परिषद मालकीच्या काही जागा या करारावर देण्यात आल्या आहेत. यामध्ये मार्कंडी येथील एका पेट्रोल पंपाचा समावेश आहे. पेट्रोलपंप व्यवस्थापकांकडून दरमहिन्याला ठरलेले भाडे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने त्याचा फटका नगर परिषद प्रशासनाच्या तिजोरीवर होत आहे. विविध कराच्या माध्यमातून नगर परिषद अत्यावश्यक सेवेसह आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.
मार्कं डी येथील पंप व्यवस्थापक शर्ती, अटींचे पालन करीत नाहीत, असाही ठपका ठेवण्यात आला आहे. ९९ वर्षाच्या करारानंतर ३ वर्षाचा करार २०११ पर्यंत करण्यात आला होता. हा करारदेखील संपल्याने पुढील करार ३० सप्टेंबर २०१४ रोजी संपत असून, याबाबतची नोटीस पाठविण्यात आली आहे.
पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापनाकडून ९ महिन्यांचे थकीत भाडे ४५ हजार रुपये नगर परिषदेच्या वसुली विभागाकडे जमा झाले असून, कराराची मुदत संपल्याने जागा खाली करण्याची नोटीस धाडण्यात आली आहे. अंदाजे २० ते २५ गुंठे जागेत हा पंप विस्तारलेला आहे. मुदतीत जागा खाली करण्यात आली नाही तर पोलीस बंदोबस्तात पंपाची जागा ताब्यात घेण्याची तयारी नगर प्रशासनाने केली आहे. कारवाई करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे, यासाठीही पत्रव्यवहार सुरु आहे. मात्र, सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार आहे. यानिमित्त या विषयाकडे लक्ष लागले आहे.
गेल्या कित्येक वर्षांनंतर या भागातील पेट्रोल पंपाबाबत पालिकेने नोटीस बजावल्याने आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गाळेधारकांचेही धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)