कोकणच्या आर्थिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:35+5:302021-06-19T04:21:35+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची ...

Pilot projects for economic development of Konkan | कोकणच्या आर्थिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प

कोकणच्या आर्थिक विकासासाठी पथदर्शी प्रकल्प

Next

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. कोकणचे सुपुत्र खासदार डॉ. सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व सातत्याने केलेल्या आग्रहामुळे देशातील निवडक सहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश या पथदर्शी प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. कोकणच्या विविध प्रश्नांचे अभ्यासक ॲड. विलास पाटणे यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काजू आणि आंबा उत्पादनाला तसेच खेकडा आणि मत्स्यशेती व पर्यटन या व्यवसायांचा विकास करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुर्लक्षित नैसर्गिक संसाधने, सेवाक्षमता आणि कौशल्य यांचा उपयोग करून विकासाची वाटचाल करण्यात येईल. लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषद यांनी हे जिल्हा विकास आराखडे बनविले असून, मुजफ्फरपूर (बिहार), वाराणसी (उत्तरप्रदेश), सोलान (हिमाचल प्रदेश) आणि विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) या अन्य चार जिल्ह्यांचाही पथदर्शी प्रकल्पात समावेश आहे.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्वाचे अंग आहे. संस्था सक्षमीकरण, दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण व ऊर्जा संवर्धन इत्यादी क्षेत्रात कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीचे उल्लेखनीय कार्य या संस्थेने केले आहे. खासदार प्रभू यांनी 'यूएनडीपी'कडे जिल्हा विकास योजनेचा प्रस्ताव पाठवला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना लिहिलेल्या पत्रात 'यूएनडीपी'चे प्रशासक आचिम स्टाईनर यांनी २०१९ च्या मार्च महिन्यात भारतभेटीच्या वेळी खासदार प्रभू यांच्याशी या विषयावर झालेल्या चर्चेच्या आठवणीलाही उजाळा दिला आहे. खासदार प्रभू यांच्या प्रयत्नामुळे कोकणात मार्गी लागत असलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद ॲड. विलास पाटणे यानी व्यक्त केला आहे.

Web Title: Pilot projects for economic development of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.