तीन दिवस सुरू राहणार पिंपळी ब्रेक टेस्ट ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:48 PM2019-08-24T12:48:53+5:302019-08-24T12:49:59+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी अंतर्गत येणारा मौजे पिंपळी (ता. चिपळूण) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.
टेंभ्ये (रत्नागिरी) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी अंतर्गत येणारा मौजे पिंपळी (ता. चिपळूण) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.
परिवहन विभागाची वाहन ४ ही प्रणाली ठकउ दिल्ली येथून चालवली जाते. यामुळे चव्हाण यांनी एनआयसी पुणे यांच्यामार्फत एनआयसी दिल्ली यांना पिंपळी (ता. चिपळूण) व हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे वेगवेगळी पूर्वनियोजित वेळ घेण्यासंदर्भात आॅनलाईन प्रणालीमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. परंतु दिल्लीकडून हा बदल तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे कळविले आहे.
यामुळे हातखंबा (ता. रत्नागिरी) व पिंपळी (चिपळूण) येथे आठवड्यातील ३ - ३ दिवस कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे. पिंपळी ट्रॅक सुरू करण्याबाबत लोकांमधून मागणी होत असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी आठवड्यातील गुरुवार, शुक्रवार व कामकाजाचा शनिवार तीन दिवस हा ट्रॅक चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागर तालुक्यातील वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.
पुरेसे मनुष्यबळ नसल्याने व दिल्लीशी पत्रव्यवहार सुरू असल्याने प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले नव्हते. विनोद चव्हाण यांनी परिवहन आयुक्तांकडे एक मोटार वाहन निरीक्षक देण्यासंदर्भात मागणी केली होती. ती आता मान्य झाली आहे.
सोमवार, दि. २६ पासून हातखंबा (ता. रत्नागिरी) येथील ट्रॅकचे कामकाज सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवसांना सुरू राहणार आहे, तर मौजे पिंपळी (चिपळूण) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकचे कामकाज गुरुवार, शुक्रवार व कामकाजाचा शनिवार या तीन दिवसांत सुरू राहणार आहे.