चिपळूणचा पाणी विभाग ठप्प
By admin | Published: July 16, 2017 06:17 PM2017-07-16T18:17:48+5:302017-07-16T18:17:48+5:30
शिवसेना गटनेते शशिकांत मोदी यांचा आरोप
आॅनलाईन लोकमत
चिपळूण (जि. रत्नागिरी), दि. १५ : चिपळूण नगर परिषदेच्या पाणी विभागाचा कारभार पूर्णत: ठप्प झाला असून, या विभागाला मुख्याधिकाऱ्यांच्या कृपेमुळे कोणीही वाली उरलेला नाही. यामुळे शहरातील पाणी नियोजन ठप्प झाले असून, नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक ऐन पावसाळ्यात पाण्याविना हैराण झाल्याचा आरोप शिवसेना गटनेते शशिकांत मोदी यांनी केला आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून पाच हजारपेक्षा अधिक घरांना व आस्थापनांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेले दोन महिने शहरातील गोवळकोट, पेठमाप, मार्कंडी, काविळतळी, परशुरामनगर, ओझरवाडी, पाग या भागातील नागरिकांना अत्यंत कमीदाबाने पाणी पुरवठा होत आहे. यावेळी पाणी पुरवठा विभागाकडील कामगारांना पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे काम न देता दुसरेच काम देऊन शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत व्यत्यय आणला जात आहे. त्यातच मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमुळेही पाणी व्यवस्था कोलमडली आहे. यामध्ये सुधारणा होण्यासाठी शिवसेनेतर्फे आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
आठ दिवसात पाणी व्यवस्थापन सुनियोजित न झाल्यास संतप्त नागरिकांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडण्यात येणार आहे. याबाबत नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व पाणी सभापती वर्षा जागुष्टे यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कामकाज करणे अवघड होत असल्याचा आरोपही गटनेते मोदी यांनी केला आहे.