बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाची उब
By admin | Published: May 18, 2016 11:01 PM2016-05-18T23:01:45+5:302016-05-19T00:17:48+5:30
दापोली तालुका : ताटातूट झालेल्या लेकरासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न
शिवाजी गोरे--दापोली --जंगलात बिबट्याची मादी व पिल्लाची ताटातूट होऊन पोरके झालेल्या त्या पिल्लासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आई व लेकराची भेट घडून येईपर्यंत बिथरलेल्या दहा दिवसांच्या त्या पिल्लाला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक मायेची ऊब देत आहेत. दापोली तालुक्यातील एका जंगलात बिबट्याचे दहा दिवसांचे पिल्लू वन विभागाला आढळून आले. त्या पिल्लाला वन विभगााने ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले व दूध दिले. त्या पिल्लाला योग्य वेळी दूध मिळाले नसते तर भूकबळीचा शिकार होऊन ते दगावण्याची शक्यता अधिक होती. परंतु वन विभागाने त्याची खबरदारी घेऊन त्याला दूध पाजून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर उपचार करवून घेतले. त्यामुळे त्याची प्रकृती चांगली आहे.
ते ज्या ठिकाणी सापडले होते, त्या ठिकाणी मंगळवारी रात्रभर पाळत ठेवण्यात आली होती. कॅमेरे लावून ठेवण्यात आले. परंतु ती त्या पिल्लाकडे फिरकलीच नाही. त्यामुळे त्या पिल्लाने अख्खी रात्र ओरडून काढली.
आजूबाजूच्या परिसरात जवळच कुठेतरी ती असण्याची शक्यता असल्याने ज्या जंगलात ते पिल्लू आढळून आले. त्या ठिकाणी पिल्लू ठेवून पाळत ठेवण्यात येत आहे.
बिबट्याची मादी पिल्लू दुसरीकडे नेताने मनुष्याचा वावर वाढल्याने किंवा त्या ठिकाणी असुरक्षित वाटल्याने पुन्हा त्या ठिकाणी आली नसावी. दोन दिवस माय लेकराची भेट न झाल्याने वनविभागाची चिंता अधिक वाढली आहे. जंगलतोडी, वणव्यामुळेसुध्दा कदाचित पिल्लू स्थलांतरीत करताना एखादं पिल्लू विसरलं जाण्याची शक्यता आहे.
जंगलतोडीमुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने बिबटे मानवी वस्तीकडे येणे असुरक्षित वाटू लागताच पिल्लू टाकून निघून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. राज्यात भूकबळी, शिकारींचे प्रमाण वाढल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या पिल्लाला जीवदान देण्यासाठी दापोलीचे वनपाल मारुती जांभळे, वनरक्षक अमित निमकर, भीमराव चौगले, अनिल साळवी, सचिन आंबेडे, वनकर्मचारी सहकार्य करीत आहेत.
दापोलीत आढळलेल्या त्या पिल्लाची योग्य काळजी घेण्यात येत असून, दोन दिवसांत मादी न आल्यास त्याला प्राणी संग्रहालयाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.
- सुरेश वरक,
वन परिक्षेत्र अधिकारी, दापोली