कळवंडे धरणाच्या घसरलेल्या पिचींगचे काम युध्दपातळीवर, धरणाला धोका नसल्याची कार्यकारी अभियंतांची माहिती
By शोभना कांबळे | Published: July 27, 2023 06:54 PM2023-07-27T18:54:43+5:302023-07-27T18:55:41+5:30
रत्नागिरी : कळवंडे लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) गुरूवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी ६ ...
रत्नागिरी : कळवंडे लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) गुरूवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता घसरल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठेकेदार व यांत्रिकीविभागाच्या यंत्रसामुग्रीसाठी तातडीने सूचना देऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत धरणाला कोणताही धोका नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी दिली.
या माती धरणाची लांबी २१० मीटर असून उंची १५.५६ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.९२८ दलघमी इतका आहे. १९८३ साली हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ०.५८७ दलघमी, सद्या धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठी आहे. धरण सुरक्षिततेकरिता विमोचकातून ८.६५ घमी/सेंकद. धरणाच्या अधोबाजूस नदी किनारी असणारे गावे बाैध्दवाडी, कातळवाडी, कोंडये, बाणेवाडी व नावतवाडी ही आहेत.
२८ जून २०२३ रोजी उर्ध्व बाजूकडील माती भरावाकडील अश्मपटल घसरले होते. त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी ६ वाजता पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल घसल्याचे निदर्शनास आले. अश्मपटल घसरलेला भाग हा पाणी पातळीच्या वरील भागातील असल्याने संबंधित ठेकेदार व यांत्रिकी विभागाच्या यंत्रसामुग्रीसाठी त्यांना तातडीने सूचना देऊन घसरलेल्या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत धरणाला कोणताही धोका नाही, असेही सलगर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.