कशेडी घाटातील महामार्गावर खड्डे, उंचवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:26+5:302021-06-22T04:21:26+5:30
खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी येथे रस्त्यावर खड्डे, उंचवटे निर्माण होऊन महामार्गाची अक्षरश: चाळण ...
खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी येथे रस्त्यावर खड्डे, उंचवटे निर्माण होऊन महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. केवळ चार दिवसांच्या संततधारेमुळे कामाचा दर्जा स्पष्ट झाला आहे. पाऊस थांबताच एल ॲण्ड टी ठेकेदार कंपनीला याठिकाणी तातडीने मलमपट्टी करण्याची वेळ आली आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वीर ते कातळी या कशेडी घाटातील टप्प्याचे काम एल ॲण्ड टी ठेकेदार कंपनीने सुरू केले आहे. मात्र, दर्जा, गुणवत्ता व निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्यासोबतच पावसाळ्यानुसार कामाचे स्वरूप ठरविण्यासंदर्भात नियोजन नसल्याने घाटातील रस्ता अल्पावधीतच जीर्ण झाला आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये धामणदिवी गावात चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगरातून दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या हाेत्या. डोंगराकडील भागात चौपदरीकरणातील रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मूळ महामार्ग धामणदिवी गावाच्या लोकवस्तीलगत असताना नवीन रस्ता हा डोंगरालगत तयार करण्यात आला आहे. हाच रस्ता पूर्णपणे उखडल्याने या भागात खड्डे आणि उंचवटे तयार होऊन छोट्या कार व जीपसदृश्य वाहनांना ये-जा करणे उंचवट्यामुळे अशक्य होऊन खड्डे आणि उंचवटे यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक छोट्या वाहनांमध्ये यामुळे बिघाड संभवत असून, अवजड वाहतूकही हेलकावे खात होत आहे.
----------------------
मुंबई - गाेवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी येथे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.