काडवली-निरबाडे पुलावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:28+5:302021-06-16T04:42:28+5:30

चिपळूण : खेड तालुक्यातील काडवली व निरबाडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये ...

Pits on Kadwali-Nirbade bridge | काडवली-निरबाडे पुलावर खड्डे

काडवली-निरबाडे पुलावर खड्डे

Next

चिपळूण : खेड तालुक्यातील काडवली व निरबाडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून, वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. या विषयाकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

खेड तालुक्यातील काडवलीकडे जाण्यासाठी निरबाडे हा जवळचा मार्ग आहे. या दरम्यान नदी वाहात असून, २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत या नदीवरील साकव वाहून गेल्याने या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. काडवली येथून निरबाडे हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली होती. या विद्यार्थ्यांना आंबडसमार्गे पालीफाट्यावरून हायस्कूलला जावे लागत असे. हा मार्ग लांबचा असल्याने पालक व ग्रामस्थांमधून दोन गावांना जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी जोरदार मागणी होऊ लागली.

लोकांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून काही महिन्यातच काडवली - निरबाडे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात आला. मात्र, या पुलावरील काँक्रीट निघून गेल्याने खड्डे पडले आहेत.

या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. पर्यायाने वाहन वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या वरील खड्डे भरण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांमधून केला जात आहे.

Web Title: Pits on Kadwali-Nirbade bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.