‘पीके’ चित्रपट बंद पाडला
By admin | Published: December 31, 2014 12:20 AM2014-12-31T00:20:53+5:302014-12-31T00:21:07+5:30
चिपळूण : शिवसेना व हिंदू जनजागृती समिती आक्रमक
चिपळूण : ‘पीके’ या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असा आरोप करून हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी येथील पूजा थिएटरमधील या चित्रपटाचे प्रक्षेपण बंद पाडले.
थिएटर व्यवस्थापक अविराज भुवड यांनी हिंदुत्ववाद्यांच्या संतप्त भावनांची दखल घेत ‘पीके’ चित्रपटांचे होर्डिंग उतरविले. यावेळी शिवसेनेचे गटनेते राजेश देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, उपशहरप्रमुख भैया कदम, शाखाप्रमुख राजेश कोळेकर, शिवसेना गटप्रमुख पप्या काणेकर, निपुण बोरगावकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणय वाडकर, हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, सुरेश राऊत, छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाचे अभिजीत गुरव, सनातन संस्थेचे हेमंत चाळके, विनायक जगताप, दीपक सुर्वे, आदी उपस्थित होते.
‘पीके’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सुरू असलेल्या हिंदूंच्या तीव्र विरोधाचे पडसाद चिपळूण येथे उमटले. शिवसेना व हिंदू जनजागृती समितीने आज या चित्रपटाविरोधात पूजा चित्रपटगृहाचे व्यवस्थापक अविराज भुवड यांना निवेदन सादर केले व आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांनी हा चित्रपट त्वरित बंद करण्यात यावा, असे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. (वार्ताहर)
भुवड यांनी चित्रपटाचे होर्डिंग उतरविल्यानंतर संतप्त लोक शांत झाले. (वार्ताहर)
हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पीके या चित्रपटावर आक्षेप घेतल्याने हा चित्रपट बंद करण्यात आला असून दि. ३१ पासून हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही, असे चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर लिहिण्यात आले आहे. मंगळवारी होणारे सर्व शो बंद करण्यात आले. आगावू घेतल्या गेलेल्या तिकिटांचे पैसे परत देण्याची भूमिकाही व्यवस्थापनाने घेतली आहे.