दिनदर्शिकेतून मिळणार आता वनस्पतींची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 11:30 AM2021-12-08T11:30:38+5:302021-12-08T11:32:13+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये दिनदर्शिकांमध्ये नवा ट्रेंड. कोकण आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये दडलेल्या जैवविविधता आणि जंगली वनस्पतींची माहिती देणारी ‘जैवविविधता दिनदर्शिका’ तयार केली आहे.
राजापूर : दरवर्षी छापण्यात येणाऱ्या दिनदर्शिकांमध्ये विविधांगी प्रकारच्या दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा नवा ‘ट्रेंड’ आलेला पाहायला मिळतो. अशा स्थितीमध्ये तालुक्यातील अणसुरे येथील हर्षद तुळपुळे या तरुणाने कोकण आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये दडलेल्या जैवविविधता आणि जंगली वनस्पतींची माहिती देणारी ‘जैवविविधता दिनदर्शिका’ तयार केली आहे. यामध्ये वर्षाच्या ३६५ दिवसांवर कोकणातील ३६५ जंगली वनस्पतींची ओळख करून माहिती दिली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये दिनदर्शिकांमध्ये नवा ट्रेंड आला आहे. पर्यावरणाविषयी सजग असलेल्या तालुक्यातील हर्षद तुळपुळे या तरुणाने कोकणातली जैवविविधता विशेष जंगली वनस्पतींवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. हर्षद तुळपुळे यांनी तयार केलल्या दिनदर्शिकेसाठी ‘जंगली वनस्पती’ ही थीम वापरण्यात आली आहे. त्यामध्ये विशेषतः कोकण आणि सह्याद्रीत आढळणाऱ्या एका जंगली वनस्पतीचा फोटो प्रत्येक तारखेवर आणि त्यासोबत वनस्पतींचे मराठी आणि वनस्पतीशास्त्रीय नावही दिलेले आहे. या दिनदर्शिकेसाठी डॉ. ऋतुजा कोलते, डॉ. अपर्णा वाटवे, डॉ. स्वप्ना प्रभू, डॉ. उमेश मुंडल्ये, डॉ. श्रीकांत कार्लेकर, पूर्वा जोशी, वसंत काळे, अश्विनी केळकर, श्रीवल्लभ साठे आणि वैभव गाडगीळ यांनी सहकार्य केले.
जैवविविधता याविषयावर आधारित अणसुरे परिसरामध्ये अभ्यास सुरू असताना अशाप्रकारची दिनदर्शिका प्रकाशित करावी असे अनेक दिवस विचार सुरू होते. त्याच्यातून ही दिनदर्शिका तयार आणि प्रकाशित करण्यात आली आहे. आपल्या भागातील जैवविविधता, जंगली वनस्पती आदींची लोकांना माहिती मिळावी आणि ती घराघरात पोहोचावी असा उद्देश आहे. - हर्षद तुळपुळे