चिपळुणात प्लास्टिक कचरामुक्त मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:59 AM2020-12-29T11:59:31+5:302020-12-29T12:01:31+5:30
Chiplun No Plastic- चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र, डाऊ केमिकल कंपनी आणि चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अडरे : चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र, डाऊ केमिकल कंपनी आणि चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेमध्ये पहिल्या टप्प्यात दुधाच्या प्लास्टिक पिशव्या जमवण्यात येणार आहेत. दूध ओतून घेतल्यानंतर या पिशव्या कचऱ्यात व पर्यायाने डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पडतात. संस्थेतर्फे या पिशव्या प्रत्येक चहाचे दुकान, हॉटेल, टपरी तसेच शहरातील गृहसंकुले, वैयक्तिक घरे येथून गोळा केल्या जातील. जेणेकरून त्या कचऱ्यात पडणारच नाहीत. यासाठी संस्थेने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले असून, सर्व व्यावसायिक तसेच गृहप्रकल्प यांच्याजवळ चर्चा केली आहे.
सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे दररोज सकाळी संपूर्ण चिपळूणमध्ये फिरून या पिशव्या जमवण्यासाठीची व्यवस्था केली आहे. जमा केलेल्या प्लास्टिक पिशव्या पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) साठी पाठवण्यात येणार आहेत. या मोहिमेमध्ये घरगुती व सोसायटी स्तरावर ओला कचरा कम्पोस्टिंग व सुका कचरा व्यवस्थापन सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी किरणविहार संकुल या ७० सदनिका असणाऱ्या गृहसंकुलामध्ये कचरा मुक्त सोसायटी हा प्रकल्प यशस्वी केला.
सोसायटीतील ओल्या कचऱ्याचे सोसायटीतच कंपोस्ट खत बनवले व सुका कचरा वर्गीकरण करून पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) साठी पाठवण्यात आला. प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे सदनिका धारकांना नगर परिषदेकडून घरपट्टीत ५ टक्के सूट मिळाली. त्याचाच पुढचा भाग म्हणून दुधाच्या प्लास्टिक पिशव्या गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वैयक्तिक, व्यावसायिक, सोसायट्या यांनी दुधाच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्या नेण्यासाठी तसेच ओला कचरा कंपोस्ट प्रकल्पात सहभागी होण्यासाठी भाऊ काटदरे, उदय पंडित यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
बायबॅककडे दुर्लक्ष
दुधाची रिकामी पिशवी उत्पादकाने बायबॅक करावी व पुनर्चक्रीकरणासाठी द्यावी, असा कायदा शासनाने केला आहे. दुधाच्या पिशवीवर बायबॅक किंमत ५० पैसे छापलेलीही आहे. दूध उत्पादकांनी या पिशव्या बायबॅक करून पुनर्चक्रीकरणासाठी द्याव्यात, असे अपेक्षित आहे. परंतु असे घडत नसल्याने दूध पिशव्यांचा कचरा वाढतच आहे.