प्लास्टिकने वाशिष्ठीचा श्वास कोंडला
By admin | Published: July 20, 2014 10:34 PM2014-07-20T22:34:53+5:302014-07-20T22:45:24+5:30
चिपळूण पालिका : गोवळकोटवासीयांच्या आरोग्याला धोका
चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीपात्रात प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच नदीतून गोवळकोट येथील पंप हाऊसद्वारे परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या कचऱ्यामुळे पाणी दूषित होण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. काही वेळा मटण मच्छी विक्रेते रात्रीच्या वेळी मृत कोंबड्यांचे अवशेष नदीत टाकतात. यापूर्वी त्यांना समज देण्यात आली होती. मात्र, अजूनही हा प्रकार थांबलेला नाही.
चिपळूण नगरपरिषदेने प्लास्टिक विरोधी मोहीम गेल्या वर्षभरापूर्वी सुरु केली होती. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची पिशवी वापरण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर पाणी अथवा अन्य थंड पेयासाठी सध्या प्लास्टिकच्या बाटलीचा वापर वाढत चालला आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे शहर व परिसरातील प्रत्येक प्रभागात नियमित घंटागाडी फिरत असते. मात्र, काही वेळा घरातील प्लास्टिक वस्तू या घंटागाडीत न देता रस्त्याच्या बाजूला किंवा गटारात टाकल्या जात आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या प्लास्टिक वस्तू पाण्यातून अन्यत्र वाहत जात आहेत.
शहरातील शीव नदी पात्रातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात आला आहे. मात्र, या नदीपात्रातही आता कचरा साचू लागला आहे. वाशिष्ठी ही नदी शहर परिसरातून वाहत असून, खेर्डी पंपहाऊस व गोवळकोट पंपहाऊस येथून परिसराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, वाशिष्ठी नदीपात्रात (नाईक पुलाजवळ) सध्या प्लास्टिक कचरा पाण्याबरोबर तरंगत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील पाणी दूषित होण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
काही वेळा चिकन विक्रेते पाण्याचा अंदाज घेऊन मृत कोंबड्यांचे अवशेष नदीपात्रात टाकत असून, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही केलेली नाही.
वर्षभरापूर्वी मृत कोंबड्यांचे अवशेष टाकण्यावरुन काही व्यावसायिकांना बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली होती. शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्प या ठिकाणी या कचऱ्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, याबाबत नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना केलेली नसल्याने नदीतील पाणी अशा घटनांमुळे दूषित होत आहे. (वार्ताहर)