मूलभूत सुविधा नसल्याने खेळाडूंची होतेय मुस्कटदाबी

By admin | Published: December 28, 2014 10:46 PM2014-12-28T22:46:01+5:302014-12-29T00:00:44+5:30

उमेश सावंतांची खंत : ‘अ‍ॅकॅडमी’ राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणार

The players have to have fun due to lack of basic facilities | मूलभूत सुविधा नसल्याने खेळाडूंची होतेय मुस्कटदाबी

मूलभूत सुविधा नसल्याने खेळाडूंची होतेय मुस्कटदाबी

Next

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे. क्रीडांगणाबरोबरच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीने आता उचलली आहे. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेऊन भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितच तयार होतील, असा विश्वास अ‍ॅड. उमेश सावंत यांनी व्यक्त केला.
येथील मुडेश्वर मैदानावर कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम रावराणे, कार्याध्यक्ष शेखर राणे, सचिव नंदकिशोर सावंत, उपाध्यक्ष मधुकर सावंत, मिलिंद बेळेकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, अनिल हळदिवे, माधुरी गायकवाड, सुभाष सावंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत म्हणाले, कणकवली शहराला अद्ययावत क्रीडांगणाची आवश्यकता आहे. क्रीडांगणाबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध झाल्यास येथील खेळाडू आणखीन चांगल्या प्रकारे आपल्या खेळाची चमक दाखवू शकतील. तसेच इतर जिल्ह्यातील खेळाडूंच्या तुलनेत आपला वेगळा ठसा उमटवू शकतील. त्यासाठी शहरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींनी एकत्र येत कनक स्पोर्ट अ‍ॅकॅडमीची स्थापना केली आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
अशोक करंबेळकर म्हणाले, चांगले खेळाडू तयार होण्यासाठी पालकांचाही खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. क्रीडा क्षेत्र विकसीत होण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांनी नैतिक तसेच आर्थिकदृष्ट्याही क्रीडा संघटनांना पाठबळ दिल्यास निश्चितच चांगले खेळाडू घडू शकतील. या अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून लवकरच अद्ययावत क्रीडांगण उभारण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरसेवक सुशांत नाईक, योगेश सावंत, नीलम सावंत - पालव, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकिशोर सावंत यांनी प्रास्ताविक करताना अ‍ॅकॅडमीच्या उद्देशांबाबत माहिती दिली. डॉ. तुळशीराम रावराणे यांनी आभार मानले. श्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: The players have to have fun due to lack of basic facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.