खेळाडूंची खिलाडीवृत्ती असणे आवश्यक
By admin | Published: November 18, 2014 10:05 PM2014-11-18T22:05:40+5:302014-11-18T23:24:59+5:30
ई रवींद्रन : राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी : खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये खिलाडूवृत्तीने खेळून आपला ठसा राष्ट्रीय स्तरावर चमकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी मंगळवारी येथे केले.
सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धांचे उद्घाटन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार, ध्वज फडकवून व क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रत्नाकर धाकोरकर, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, राज्य संघटनेचे उपसचिव डॉ. प्रशांत जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्यासह १४ ते १७ वयोगटातील राज्यातून आलेले शालेय विद्यार्थी व त्यांचे संघ व्यवस्थापक उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. राज्यातील आठ विभागातून आलेल्या शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या सर्व विद्यार्थ्यांचे मी सिंधुुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने स्वागत करतो. खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेची चमक खिलाडूवृत्तीने दाखवून राष्ट्रीय स्तरावर आपला विभाग व विद्यार्थी चमकेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धा पाहून आपल्या जिल्ह्यातूनही असे खेळाडू निर्माण व्हावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले. ते म्हणाले, या स्पर्धांमध्ये राज्यातील आठ विभागस्तरावरून या स्पर्धेत १४ ते १७ वर्षांखालील वयोगटातील ५१२ विद्यार्थी त्यांचे संघ व्यवस्थापक सहभागी झाले असून मंगळवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धा २० नोव्हेंबरपर्यंत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने खिलाडूवृत्तीने खेळावे त्याचबरोबर केंद्र, राज्य, जिल्हास्तरावर राष्ट्रीय स्वच्छता अभियान सुरु आहे त्यास हातभार लावावा असे आवाहनही दीक्षित यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हा सचिव अजय शिंदे यांनी केले.
या खेळाची सुरुवात श्रीफळ वाढवून व टॉस टाकून जिल्हाधिकारी यांनी केली. अमरावती व नागपूर संघांनी प्रथम खेळास सुरुवात
केली. (प्रतिनिधी)