वीज गेली... पुणे, मुंबई येथे संपर्क साधा
By admin | Published: July 15, 2014 12:11 AM2014-07-15T00:11:07+5:302014-07-15T00:14:48+5:30
नवा फतवा : उपनगराध्यक्ष शहा यांनी दिला आंदोलनाचा इशारा
चिपळूण : जीवनावश्यक वस्तूंसह आज ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विजेची गरज भासू लागली आहे. हातावर पोट भरणाऱ्या व्यक्तीच्या घरातही आता वीज आली आहे. यापूर्वी वीज ग्राहकांची काही तक्रार असल्यास स्थानिक पातळीवर कार्यालयाशी संपर्क साधल्यास काही वेळातच तक्रारीचे निवारण केले जात होते. मात्र, आता वीज गेल्यास मुंबई, पुणे येथे संपर्क साधावा, या नव्या फतव्याने सर्वसामान्य ग्राहकांत नाराजीचा सूर उमटत आहे. महावितरण कंपनीच्या या कारभाराविरोधात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
यापूर्वी एखाद्या ग्राहकाने चिपळूण येथे २५२८७४ या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधल्यास त्याच्या तक्रारीचे निवारण काही तासातच केले जात असे. मात्र, सध्या आपल्या घरातील वीज गेल्यास १८००२३३३४३५ (मुंबई), १८००२००३४३५ (पुणे) येथे संपर्क साधण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जात आहे. हे क्रमांक टोल फ्री असले तरी व्यस्त असल्याचे सांगितले जाते. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आपला ग्राहक क्रमांक व काय आहे, लाईट कशी गेली याचे कारणही नमूद करावे लागत आहे. त्यानंतर संबंधितांकडून जो ग्राहक त्या ठिकाणी राहात असेल त्याच्या जवळच्या कार्यालयात एसएमएसद्वारे तक्रार निवारण करण्याचा संदेश दिला जातो. मात्र, या प्रक्रियेला १२ तासांहून अधिक वेळ जात असून, ज्याच्या घरी फोन नाही, त्याने कोणाशी संपर्क साधायचा, असाही ग्राहकांमध्ये संभ्रम होत आहे, असे शाह यांनी सांगितले.
महावितरण कंपनीची तक्रार निवारण्याबाबतची टोल फ्री क्रमांकाची सुविधाही फार अडचणीची असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? स्थानिक गाव पातळीवरच पूर्वीप्रमाणे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सर्व पक्षीयांतर्फे निवेदन दिले जाणार आहे. योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाह यांनी दिला आहे. (वार्ताहर)