चोरद नदीवरील पुलाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 05:41 PM2017-07-22T17:41:07+5:302017-07-22T17:41:07+5:30
दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भाग कोसळण्याच्या स्थितीत
आॅनलाईन लोकमत
खेड (जि. रत्नागिरी), दि. २२ : खेड - आंबवली मार्गावरील भरणे - सुकिवलीदरम्यान बांधण्यात आलेल्या चोरद नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूस केलेल्या भरावाला संरक्षक भिंत न बांधल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची जातीनिशी पाहणी करून हे काम तातडीने करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास याविरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश घोले यांनी दिला आहे़
सुकिवली येथील चोरद नदीवर बांधण्यात आलेला हा पूल गेली ६० वर्षे आपले अस्तित्व टिकवून होता. या पुलाची डागडुजी करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात वारंवार पुराचे पाणी पुलावर येत असे.़ त्यामुळे साहजिकच खेड-आंबवली तसेच अठरागाव धवडे-बांदरी विभागातील जनतेचे यावेळी मोठे हाल होत असत. या सर्व बाबींचा विचार करता येथे नव्याने पुलाची उभारणी करण्याची जनतेची मागणी आहे.
आघाडी सरकारच्या काळात या पुलाला निधी उपलब्ध झाला. गेली दोन वर्षे या पुलाचे काम सुरू होते. पुलाचे काम जून २०१७मध्ये पूर्ण झाले आणि वाहतूक सुरू झाली. याचवेळी पुलाच्या दोन्ही बाजूंनी मातीचा भराव करण्यात आला आहे. मात्र, हा भराव पावसाळ्यात वाहून जाणार हे निश्चित होते. या भरावासाठी येथे संरक्षक भिंतदेखील बांधण्यात आलेली नाही़ त्यामुळे ऐन पावसामध्ये मातीचा हा भराव खालील बाजूला सरकू लागला आहे. काही दिवसातच हा भराव संपूर्णपणे खचण्याची शक्यता आहे.़ यामुळे दोन्ही बाजूच्या रस्ता खचणार असून, पुलाच्या काही भागाला याचा धोका निर्माण होणार आहे.