बुरखाधारी महिलेकडून लूट
By admin | Published: September 12, 2014 11:32 PM2014-09-12T23:32:20+5:302014-09-12T23:37:06+5:30
वृध्दा जखमी : पाण्याचा बहाण्याने चोरी करताना हातोड्याने मारहाणही
रत्नागिरी : पाणी मागण्याचा बहाणा करून घरात आलेल्या बुरखाधारी महिलेने ७२ वर्षीय वृध्देच्या डोक्यावर हातोड्याचा प्रहार करीत तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर बेकायदेशीररित्या घरात शिरून घरातील सुमारे ३० हजारांचे सोन्याचे दागिने व ४ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हा प्रकार आज (शुक्रवार) सकाळी १०.३० वाजता शहरातील हयातनगर भागात बैतुलफला अपार्टमेंटमध्ये घडला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हयातनगरमधील यास्मीन फकिर महंमद मुल्ला (७२) या बैतुलफला या अपार्टमेंटमधील रुम नंबर ३०२ मध्ये राहतात. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एक बुरखाधारी महिला त्यांच्या फ्लॅटकडे आली. तिने पिण्यास पाणी मागितले. त्यानंतर पैशांची मागणी केली व नंतर वृध्देच्या डोक्यावर हातोडीचा जबर प्रहार केला.
घटनास्थळी माहिती घेता यास्मीन या प्रहाराने जखमी झाल्याने खाली कोसळल्या व बेशुध्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी घरी अन्य कोणीही नव्हते. यास्मिन यांना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शुध्द आली. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पंचनामा करण्यात आला. त्याचवेळी जखमी यास्मीन यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)