दापाेलीत शिकारी टाेळी जेरबंद; पोलिसांची मोठी कारवाई
By अरुण आडिवरेकर | Published: June 18, 2023 02:48 PM2023-06-18T14:48:03+5:302023-06-18T14:49:43+5:30
ही कारवाई शनिवारी (१७ जून) रात्री १२ ते रविवारी (१८ जून) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीत करण्यात आली.
रत्नागिरी : जिल्हा पाेलिस दलातर्फे ‘ऑपरेशन ऑल आउट’ माेहीम राबवण्यात येत असून, या माेहिमेंतर्गत वन्यजीव प्राण्यांची अवैध शिकार करणाऱ्या टाेळीच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. या टाेळीकडून १२ बाेर रायफल व १५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (१७ जून) रात्री १२ ते रविवारी (१८ जून) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीत करण्यात आली.
पाेलिसांनी अक्षय बळीराम नागळकर (रा. घोडबंदर रोड, भाईंदर ठाणे), योगेश विठ्ठल तुरे (रा. टाळसुरे, दापोली), सचिन कचेर पाटील (रा. दापोडे भिवंडी, ठाणे) व कारण उर्फ बंटी शिवाजी ठाकूर (रा. भिवंडी ठाकराचा पाडा, ठाणे) या चाैघांना अटक केली आहे.
खेड उपविभागामध्ये नाकाबंदी, तपासणी व गस्त घालत असताना दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये प्राण्यांची शिकार करणारी टोळी वाहनासहीत फिरत असल्याची गोपनीय माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले.
या पथकाद्वारे दापोली येथील जंगलमय भागात गस्त घालण्यात आली. रात्री ३ वाजण्याच्या दरम्यान मौजे दळखण (ता. दापोली) या ठिकाणी एक संशयास्पद चारचाकी गाडी अंधाराचा फायदा घेत वेगाने पुढे जाताना आढळली. गाडीच्या टपावर दाेन व्यक्ती बसलेल्या हाेत्या. ही गाडी थांबवून झडती घेतली असता गाडीमध्ये अन्य दाेन व्यक्तींसह १२ बोरची रायफल व १५ जिवंत काडतुसे मिळाली. या कारवाईत पाेलिसांनी ३ लाख ३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दापाेली पाेलिस स्थानकात चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पाेलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर, दापाेलीचे पाेलिस उपनिरीक्षक गंगधर, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल एम. एच. केतकर, पाेलिस काॅन्स्टेबल विनय पाटील यांनी केली.