बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत पोदारच्या अन्विताला रजत पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:24+5:302021-06-19T04:21:24+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्रात प्रतिष्ठेची असणारी बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत ...
रत्नागिरी : महाराष्ट्रात प्रतिष्ठेची असणारी बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी अन्विता मंगेश देसाई हिने या स्पर्धेत रजत पदक पटकावले.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे गेली ४० वर्षे ही परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन व विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व मुलाखत या चार टप्प्यांत सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित केली जाते. या वर्षी जागतिक महामारी 'कोविड १९' मुळे प्रथमच ही स्पर्धा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पार पडली. कचऱ्याचे व्यवस्थापन (packaging waste management) हा प्रकल्पाचा विषय होता. त्यात प्लास्टिक बाटली कचरा व्यवस्थापन (plastic bottle waste management) या विषयावरील प्रकल्प अन्विताने सादर केला. तसेच कोल्हापूर विभागात इंग्रजी माध्यमातील लेखी परीक्षेत तिने प्रथम क्रमांकदेखील मिळविला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेसाठी तिला पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक कीर्तिकुमार देशमुख, युरेका सायन्स क्लबच्या शिक्षिका केणी व प्राध्यापिका स्वप्रजा मोहिते तसेच सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.