सतीश कामत यांना ‘लोटिस्मा’चा कवीवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:06+5:302021-09-24T04:37:06+5:30
रत्नागिरी : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक कार्यासाठीचा कवीवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार शेती व्यवसायातील ...
रत्नागिरी : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक कार्यासाठीचा कवीवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार शेती व्यवसायातील प्रसिद्ध राजवाडी पॅटर्नचे प्रणेते आणि गेल्या चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना जाहीर झाला आहे. वाचनालयाच्या कार्यकारिणीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
कामत यांची पत्रकारितेतील कारकीर्द पुणे - दिल्ली - मुंबई - कोकण अशी राहिली आहे. कामत यांचे शिक्षण एम. ए. (इंग्लिश) आहे. कॉलेजपासून लेखनाची आवड जोपासणाऱ्या कामत यांच्या पत्रकारितेची सुरुवात आणीबाणीनंतरच्या काळात झाली आहे. ‘अध्यापन की पत्रकारिता’ अशा विचारातून त्यांनी पत्रकारिता निवडली होती. जून २००७पासून कामत हे संगमेश्वर तालुक्यातील त्यांचे मूळगाव असलेल्या राजवाडी येथे पिपल्स इम्पॉवरिंग मूव्हमेंट ((पेम) या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवत आहेत. कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या यशस्वी ‘राजवाडी पॅटर्न’चे ते प्रणेते आहेत. कोकणातल्या आर्थिक, सामाजिक मागासलेपणाची आणि समस्यांची जाणीव असल्याने यासाठी जमलं तर काहीतरी करावं, या विचारातून राजवाडीत काम उभे राहात गेले. शाळेतल्या मुलांसाठी कार्यक्रम, मुलांच्या गरजांची यादी करून शैक्षणिक साहित्य वाटप, शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पालकांशी संवाद, पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक, श्रमदान, शेती अशा टप्प्यांवरून कार्यरत होत पेम संस्थेने राजवाडी भाजी पॅटर्न निर्माण केला आहे.
कामत यांच्या पत्रकारितेतील मराठवाडा नामांतर आंदोलन, दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि केरळमधील मार्क्सवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघर्षावरील लेखनमाला विशेष गाजल्या होत्या. पत्रकारितेच्या माध्यमातून स्व. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, चंद्रशेखर, राजीव गांधी, मधु दंडवते यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना प्रत्यक्ष भेटलेले, निवडणुकांच्या निमित्ताने बिहार, उत्तर प्रदेश, तर दंगल कव्हर करण्यासाठी हैदराबादला भ्रमंती केलेल्या कामत यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचा साठा आहे. मराठी साहित्य विश्वातील विद्याधर पुंडलिक, विश्राम बेडेकर, दि. बा. मोकाशी आदींनी त्यांना प्रभावित केलं आहे. अमरावतीतील तपोवन आश्रमचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन आदी असंख्य मान्यवरांच्या आठवणी त्यांच्याकडे आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.