कार्तिकी एकादशीनिमित्त गेलेल्या संगमेश्वरातील भाविकांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:17 PM2019-11-09T13:17:09+5:302019-11-09T13:19:18+5:30
रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेनिमित्त पंढरपूरला गेल्या भाविकांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३० भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...
रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेनिमित्त पंढरपूरला गेल्या भाविकांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३० भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. या सर्व भाविकांवर शनिवारी पहाटेपासून पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २ बालके आणि १० महिलांचा सहभाग आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कर्जा कुंभारवाडी येथील सुमारे ६० ते ७० लोकांची एक दिंडी पंढरपूरच्या वारीसाठी गेली होती. ही सर्व मंडळीयेथील धुंडामहाराज मठ्ठा शेजारील इनामदार वाड्या वास्तव्याला होती. त्यांनी उपवासाची खिचडी आणि भगर देखील स्वत: करून खाल्ली होती. यातूनच त्यांना विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एकादशी दिवशी उपवासाचे पदार्थ आणि त्यानंतर खिचडी भाविकांनी खाल्ली. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून त्यांना उलट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला भाविकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्रशासनाकडून उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनातर्फे या भाविकांजवळील अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेतील रुग्णांची प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर यांनी पाहणी केली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी तातडीने तेथील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. तसेच त्यांच्या शिक्षण संस्थेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर हे माजी विद्यार्थी वारकऱ्यांच्या मदतीसाठी रूग्णालयात दाखल झाले आहेत.