मशरुममुळे मुर्शीत नऊजणांना विषबाधा, संगमेश्वर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:32 PM2020-07-28T12:32:47+5:302020-07-28T12:36:00+5:30
संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - वाणीवाडीतील नऊजणांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोघांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी - वाणीवाडीतील नऊजणांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोघांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
मुर्शी येथील शरद रमाकांत भिंगार्डे (६५), सुमती बाळकृ ष्ण भिंगार्डे (९०), चिन्मय सुधाकर भिंगार्डे (१९), शिल्पा सुधाकर भिंगार्डे (४०), सुधाकर विठोबा भिंगार्डे (५५), अरविंद पुरुषोत्तम भिंगार्डे (७१), अंजना रत्नकांत भिंगार्डे (५४), आशिष रत्नकांत भिंगार्डे (२१), रत्नकांत बाळकृष्ण भिंगार्डे (६०) या सर्वांच्या जेवणात रानातील मशरुमचा समावेश होता.
या सर्वांना रात्री जेवणानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास उलटी होण्यास सुरुवात झाल्याने त्यांना प्रथम कोंडगाव येथील डॉ. विद्याधर केतकर यांच्या खासगी दवाखान्यात आणले. त्यानंतर त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
त्यातील सुमती भिंगार्डे व शिल्पा भिंगार्डे यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले, तर सात जणांवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती सुधारत आहे. साखरपा येथील रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते यांनी उपचार केले.