‘कोरे’त प्रवाशांना धक्काबुक्की
By admin | Published: May 1, 2016 12:32 AM2016-05-01T00:32:26+5:302016-05-01T00:41:39+5:30
तक्रार करुन दुर्लक्ष : एका सीटसाठी मोजावे लागताहेत २०० रुपये; प्रशासनाकडून कारवाईची मागणी
गणपतीपुळे : मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या कोकणकन्या, मंगळूर, मांडवी, आदी रेल्वे गाड्यांना असणाऱ्या सामान्य डब्यात प्रवाशांना तिकिटाव्यतिरिक्त बसण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर सामान्य डब्यातून प्रवास करताना धक्काबुक्कीला सामोरे जावे लागत आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे प्लॅटफॉर्मला गाड्या लागण्यापूर्वीच सामान्य डब्यांमध्ये अनेक तरुण सीटचा ताबा घेतात. प्रवासी डब्यात चढल्यानंतर जवळजवळ सर्वच सीटवर या तरुणांनी ताबा घेतल्याने काही प्रवासी उभ्याने किंवा दरवाजात बसून प्रवास करतात. यावेळी काही प्रवाशांबरोबर लहान मुले, महिला असल्याने नाईलाजास्तव प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे संबंधित तरुणांना पैसे दिल्यानंतर सीट बसण्यास दिली जाते. काहीवेळातच बहुतेक प्रवासी हे या तरुणांना पैसे देऊन बसण्यासाठी सीट मिळवतात.या तरुणांबाबत काही प्रवाशांनी परिसरात असणाऱ्या रेल्वे पोलिसांना सांगूनदेखील या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे रेल्वे अधिकारीदेखील जाणूनबुजून दुर्लक्ष करतात का? या प्रकारामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधून होत आहे. (वार्ताहर)
प्रवाशांशी हुज्जत : गाडीत आधीपासूनच जागा अडवून बसतात
मुंबई येथून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये काही तरूण आधीच जागा अडवून बसलेले असतात. प्रवाशांनी आत प्रवेश केल्यावर त्यांच्याशी हुज्जत घातली जात असल्याचे दिसते.
गर्दीचा फायदा
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची लुबाडणूक केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याला आळा घालण्याची मागणी होत आहे.