रत्नागिरीत आज पोलिसांचे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:10+5:302021-07-16T04:22:10+5:30
रत्नागिरी : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञात रत्नागिरीतील पोलीसही सहभागी होणार असून, शुक्रवारी पोलीस मुख्यालयातच हे शिबिर होणार आहे. ...
रत्नागिरी : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञात रत्नागिरीतील पोलीसही सहभागी होणार असून, शुक्रवारी पोलीस मुख्यालयातच हे शिबिर होणार आहे.
अनेकविध उपक्रमांमधून ‘लोकमत’ने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या कोरोना स्थितीमुळे महाराष्ट्रभर रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘लोकमत’ने रक्तदानाचा महायज्ञ उपक्रम हाती घेतला आहे. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबुजी यांच्या जयंती दिनापासून महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत रत्नागिरीसह चिपळूण, देवरुख, राजापूर अशी सहा शिबिरे झाली असून, वाढती कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण, मुसळधार पाऊस अशा वातावरणातही दात्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशन, राजरत्न प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटना, चिपळूण रोटरी क्लब, चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण, देवरुखचे केशवसृष्टी युवा मंडळ, मातृमंदिर संस्था, एमएमएस रुग्णालय, मित्रमेळा राजापूर, रत्नागिरीतील संपर्क युनिक फाऊंडेशन, रत्नदुर्ग माऊंटेनियर्स, वैश्य युवा संस्था, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, जीवनदान संस्था आणि क्रेडाई या संस्थांनी या शिबिरांसाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
दि. २ जुलै रोजी झालेल्या पहिल्या शिबिराला आवर्जून हजेरी लावणारे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले होते. त्यामुळे पोलिसांचे रक्तदान शिबिर घेण्यासही त्यांनी तत्काळ होकार दर्शवला. त्यानुसार शुक्रवार, १६ जुलै रोजी भारतीय जैन संघटना आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाची रक्तपेढी यांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस मुख्यालयात हे शिबिर होणार आहे. सकाळी १० ते २ यावेळेत हे शिबिर होणार असून, त्यात सर्वसामान्य दात्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.