अलोरे-शिरगांव रस्त्यावर वयोवृद्ध महिलेला लुटले, पोलिसांनी चोरट्यांना पाठलाग करून पकडले 

By संदीप बांद्रे | Published: July 27, 2023 06:38 PM2023-07-27T18:38:39+5:302023-07-27T18:40:14+5:30

चिपळूण : तालुक्यातील मुंढे येथील वयोवृद्ध महिलेला शिरगांवला सोडतो असे सांगून गाडीत बसवले आणि तिच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून ...

Police caught the four who robbed an elderly woman at Kumbharli Ghat | अलोरे-शिरगांव रस्त्यावर वयोवृद्ध महिलेला लुटले, पोलिसांनी चोरट्यांना पाठलाग करून पकडले 

अलोरे-शिरगांव रस्त्यावर वयोवृद्ध महिलेला लुटले, पोलिसांनी चोरट्यांना पाठलाग करून पकडले 

googlenewsNext

चिपळूण : तालुक्यातील मुंढे येथील वयोवृद्ध महिलेला शिरगांवला सोडतो असे सांगून गाडीत बसवले आणि तिच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून घेत मध्येच रस्त्यावर उतरवले. अलोरे शिरगांव रस्त्यावर बुधवारी भरदिवसा हा प्रकार घडला. याप्रकरणी शिरगाव पोलिस स्थानकात तक्रार होताच पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा कुंभार्ली घाटात पाठलाग करून चौघांना पकडून ९३ हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ जप्त केली.

सूरज समाधान काळे (वय-२१), सरस्वती सूरज काळे (२१, दोघेही रा कुंभारी, उस्मानाबाद), राहुल अनिल शिंदे (३५), कामिनी राहुल शिंदे (३२, दोघेही रा. सारोळे, बार्शी, सोलापूर) या चार जणांना अटक केली आहे. अलोरे शिरगांव पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला. 

तालुक्यातील मुंढे येथील ६५ वर्षीय महिला बँकेत पेंशनची काही रक्कम काढण्यासाठी जात होती. त्यासाठी मुंढे बस थांब्यावर त्या उभ्या होत्या. शिरगांवकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना एक कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली व चालकाने तुम्हाला कुठे जायचे आहे, असे विचारून त्यांना गाडीत पुढे बसण्यास सांगितले. परंतु गाडीत पुरेशी जागा नसल्याचे सांगून त्यांच्या सोबत असलेल्या महिलेस गाडीमध्ये घेतले नाही. काही अंतरावर गेल्यावर गाडीमधील बसलेल्या एका महिलेने व तरुणाने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून घेतली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिरगांव येथील ब्राह्मणवाडी जवळ त्यांना गाडीतून खाली उतरवले आणि ते निघून गेले. 

त्यानंतर वयोवृद्ध महिलेने एसटी बसने अलोरे शिरगांव पोलीस स्थानक गाठले. आपली तक्रार देऊन सदर गाडीचा नंबर १६५७ असल्याचे व यातील असणाऱ्या व्यक्तींचे वर्णन पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत संबंधित गाडीचा पाठलाग करून कुंभार्ली घाटामध्ये शिताफीने चोरट्यांना पकडले. या चारही जणांना पोलिसांनी अटक करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांची गाडीदेखील ताब्यात घेतली आहे. अलोरे पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत गडदे, पोलिस हवालदार गणेश नाळे, पोलिस शिपाई राहुल देशमुख व महिला होमगार्ड विजया चिपळूणकर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Police caught the four who robbed an elderly woman at Kumbharli Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.