पोलीस वसाहतींना प्रतीक्षाच!
By admin | Published: June 17, 2016 09:50 PM2016-06-17T21:50:08+5:302016-06-17T23:52:09+5:30
दापोली : गेल्या चार वर्षात वसाहतींची दुरूस्तीच झाली नसल्याचे उघड
दापोली : दापोली येथील पोलीस निवासस्थाने गेली चार वर्ष दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दापोली पोलीस स्थानकाच्या शेजारी पोलीस वसाहत वसली आहे. यातील केवळ ३९ घरे ही राहण्यायोग्य आहेत. या वसाहतीच्या शेजारी काळ्या दगडात बांधण्यात आलेली आणखी एक जुनी व राहण्यास अयोग्य अशी पोलीस वसाहत आहे. मात्र, या वसाहतीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या कमालीच्या दुर्लक्षामुळे ही वसाहत आता मोडकळीस आली आहे.
या वसाहतीतील अनेक घरांची दारे व खिडक्या गायब झाल्या आहेत. तर आतमध्ये उंदीर व घुशींचे साम्राज्य आहे. यामुळे या जुन्या वसाहतीतील १४ घरांमध्ये राहण्यायोग्य परिस्थिती नाही. या वसाहतीची योग्य निगा राखण्यात आली असती, तर आणखी १४ पोलीस कुटुंबांची राहण्याची व्यवस्था झाली असती. या वसाहतीच्याच शेजारी आणखी एक पोलीस वसाहत असून, येथे ३९ घरे पोलीस कुटुंबांकरिता उपलब्ध आहेत. यापैकी २ अधिकाऱ्यांचे बंगले तर उर्वरीत ३७ घरे ही कर्मचाऱ्यांसाठी आहेत. वसाहतीतील घरांमध्ये सध्या ३७ पोलीस कुटुंबे निवास करत आहेत. अधिकाऱ्यांसाठी असलेल्या अन्य दोन निवासस्थांमध्ये काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने नेमलेल्या ठेकेदाराचा कामगार येऊन नावापुरती डागडुजी करून गेला. मात्र, त्यालगत असणाऱ्या ३७ पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांकडे मात्र ठेकेदाराचा माणूस फिरकलादेखील नाही. या ३७ घरांच्या कौलांची गेली ४ वर्ष योग्य निगा न राखल्याने जवळजवळ सर्वच निवासस्थाने पावसाळ्यात गळायला लागली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात घरांमध्ये तर पाणी येतेच शिवाय या पाण्यामुळे घरांच्या भिंतीदेखील ओल्या होतात. जमीन ओलसर झाल्याने या घरांमध्ये धड झोपतासुध्दा येत नाही. कर्मचाऱ्यांच्या मुलांना अभ्यास करणे अवघड होऊन बसले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील वयोवृध्दांचेही हाल होतात. यातील अनेक निवासस्थानांच्या दरवाजांची देखील कमालीची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने आपापल्या खोल्यांची व त्यापुढील शेडची दुरूस्ती करण्यास सुरूवात केली आहे. या निवासस्थानांच्या समोर असलेल्या जुन्या नारळाच्या झाडांमुळे अनेक नारळ हे या घरांवर पडतात. यामुळे प्रत्येकवेळी या घरांच्या कौलांचे प्रचंड नुकसान होते. हे नारळ रात्री -अपरात्री केव्हाही घरांवर पडत असल्याने कौले फुटून मोठा आवाज होतो. यामुळे अनेकवेळा ड्युटीवरून आल्यानंतर विश्रांती घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची झोपमोडदेखील होते. (प्रतिनिधी)
नशिबी उपेक्षाच : पोलिसांचे कुटुंब भीतीच्या छायेखाली
नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली आहे. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या पोलिसांना कौटुंबिक सुख मिळत नाहीच, पण आपले कुटुंब सुखाने राहील की नाही, ही भीती मनात घेऊन त्यांना बाहेर राहावे लागत आहे. दापोलीतील वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबांना भीतीच्या छायेखालीच जीवन जगावे लागत असल्याचे चित्र आहे.
अधिकाऱ्यांसाठी असलेल्या दोन निवासस्थानांमध्ये काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने डागडुजी केली. मात्र, पोलीस वसाहतीकडे हा ठेकेदार फिरकलादेखील नाही. या वसाहतीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष का? असा सवाल केला जात आहे.