रात्रीची ड्यूटी आटोपून सकाळी घरी आले, अन् हृदयविकाराच्या धक्क्याने गेले; मंडणगडच्या पोलिसाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:44 PM2022-12-29T12:44:13+5:302022-12-29T12:44:40+5:30
परत ड्यूटीवर जाणार होते. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा मुलगा त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेला. मात्र, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
मंडणगड : रात्रीची ड्यूटी आटोपून सकाळी घरी आले आणि नाश्ता केल्यानंतर काही वेळातच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचा प्रकार बुधवारी मंडणगड पोलिस स्थानकात पोलिस हवालदार संदीप प्रकाश गुजर (४५, मूळ गाव पालवणी जांभुळनगर, सध्या राहणार आवाशी, ता. खेड) यांच्याबाबत घडला. पोलिसाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची ही तालुक्यातील महिन्याभरात दुसरी घटना आहे.
संदीप गुजर मंगळवारी रात्रीच्या ड्यूटीवर होते. बुधवारी सकाळी ते घरी आले. अंघोळ करून त्यांनी नाश्ता केला. त्यानंतर ते परत ड्यूटीवर जाणार होते. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा मुलगा त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेला. मात्र, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. मंडणगड ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व कुटुंबीय आहेत. त्यांची पत्नीही मंडणगड पोलिस स्थानकात कार्यरत आहे.
महिनाभरात दुसरी घटना
तालुक्यातील महिनाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधी ३ डिसेंबर रोजी बाणकोट सागरी पोलिस स्थानकातील रवींद्र लक्ष्मण पवार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.