पोलिसांचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:36+5:302021-04-17T04:31:36+5:30
रत्नागिरी : गुरुवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चांगलाच दणका दिला जात ...
रत्नागिरी : गुरुवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चांगलाच दणका दिला जात असून कोरोना चाचणी सक्तीची केली जात आहे. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांनी पोलिसांचा चांगलाच धसका घेतला आहे.
संभ्रम कायम
चिपळूण : शासनाने लॉकडाऊन संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. मात्र या नियमावलीत नेमके काय सुरू ठेवायचे आणि काय बंद ठेवायचे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेबरोबरच अन्य विक्रेत्यांमध्येही गोंधळाची स्थिती कायम आहे.
सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
खेड : एसटी महामंडळाच्या येथील आगारातील सेवा देणारे वरिष्ठ लिपिक नवनाथ कदम, कर्मचारी श्रीधर संसारे आदींसह तिघांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी आगारप्रमुख प्रशांत करवंदे, स्थानकप्रमुख नंदकुमार जाधव, कार्यशाळा अधीक्षक वणकुंद्रे, साहाय्यक वाहतूक निरीक्षक सीमा पाटील आदी उपस्थित होते.
घरात राहून अभिवादन
खेड : तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच करण्याचे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले होते. त्यानुसार बहुसंख्य आंबेडकरी जनतेने घरातच जयंती साजरी केली.
आरोग्य यंत्रणेवर ताण
राजापूर : कोरोना रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली आहे. मात्र रुग्णालयांची कमतरता भासत असतानाच त्यातील कर्मचारी वर्गही अपुरा आहे. लसीकरण मोहीम सुरू असतानाच वाढलेल्या कोरोनाला नियंत्रणात आणणे आरोग्य यंत्रणेला अवघड झाले आहे. सध्या दोन्ही आघाडींवर लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे.
प्रवासी घटले
मंडणगड : शासनाने लॉकडाऊन काळात नागरिकांना बाहेर येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे रिक्षा वाहतूक सुरू असली तरीही प्रवासी संख्या घटल्याने रिक्षा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या वर्षी सुमारे १० महिने हा व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक मंदीला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा हीच वेळ आली आहे.
बसफेऱ्या सुरू
खेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेकरिता काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी येथील आगारातील तात्पुरत्या स्वरूपात पाच बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. खेड-चिपळूण, खेड-दापोली, खेड-मंडणगड, खेड-रत्नागिरी आणि खेड-नौसील अशा या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
परीक्षा घेण्याची मागणी
दापोली : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्याची मुभा मिळाली आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून सद्य:परिस्थितीत योग्य ठरेल अशा रीतीने योग्य पर्याय काढून या परीक्षा घेण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.