लाच घेताना पोलीस अटकेत
By admin | Published: January 5, 2017 11:48 PM2017-01-05T23:48:28+5:302017-01-05T23:48:28+5:30
लाच घेताना पोलीस अटकेत
रत्नागिरी : अटक न करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस नाईक संदीप गजानन महाडिक (वय ३९, पोलिस वसाहत, रत्नागिरी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून राधाकृष्ण पोलिस चौकीतच रंगेहात अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून हा पोलिस कर्मचारी या पथकाच्या रडारवर होता.
यातील तक्रारदार हा रिक्षाचालक असून, त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये एक खटला चालू होता. या रिक्षाचालकाविरुद्ध जामीनपात्र वॉरंट रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याकडून पोलिस नाईक संदीप महाडिक यांच्याकडे देण्यात आला होता. त्यावेळी या रिक्षाचालकालाअटक न करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी महाडिक याने रिक्षावाल्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील एक हजार रुपये त्यांनी घेतले होते. त्यानंतर संदीप याने आणखी एक हजार रुपयांचा तगादा या रिक्षाचालकाकडे लावला.
त्यामुळे त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या हवालदाराची तक्रार दोन दिवसांपूर्वी दिली. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संदीप महाडिक हा पोलिस कर्मचारी या पथकाच्या रडारवर होता.
दरम्यान, गुरुवारी सकाळी या पथकाने संदीपसाठी सापळा लावला होता; परंतु तो शासकीय कामासाठी तहसीलदार कार्यालयात गेला होता. त्यामुळे त्यावेळी ताणे बचावला; परंतु सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास संदीपने पुन्हा रिक्षाचालकाकडे पैशासाठी फोन केला. संदीप याला पैसे देण्यासाठी रिक्षाचालक राधाकृष्ण पोलिस चौकीत गेला. त्याचवेळी एक हजार रुपये घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकांच्या जाळ्यात अडकला. त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव याच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनवणे, तळेकर, सहायक पोलिस फौजदार शिवगण, कदम, पोलिस हवालदार कोळेकर, सुपल, ओगले, पोलिस नाईक भागवत, वीर, पोलिस शिपाई हुंबरे व नलावडे यांनी केली. (वार्ताहर)