कोरोना चाचणीसाठी जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस मित्र आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:13+5:302021-07-16T04:22:13+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा परिसरात कोरोना चाचणीसाठी जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस मित्र एकत्र आले असून, ग्रामस्थांचा चाचणीसाठी होणारा ...
रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा परिसरात कोरोना चाचणीसाठी जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस मित्र एकत्र आले असून, ग्रामस्थांचा चाचणीसाठी होणारा विरोध आता मावळू लागला आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
जयगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन ढेरे, राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे, खंडाळा आरोग्यवर्धिनी दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम, डॉ. सोनल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस मित्र किरण बैकर, प्रसाद गुरव, किशोर कुलये, संदीप बलेकर, रमेश पवार, अभिषेक गुरव, विजेंद्र वीर, राजेश कासार, शिवा गोताड, शेखर पागडे, वैभव बलेकर हे सर्वजण खंडाळा परिसरातील गावांमधील लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे आले आहेत.
आतापर्यंत परिसरातील ग्रामस्थांचा कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी विरोध होता. त्यामुळे ग्रामस्थ चाचणी करण्यासाठी पुढे येत नव्हते. मात्र, वेळेवर चाचणी झाली तर बाधितांवर वेळेवर उपचार होतील, याबाबत उपनिरीक्षक नितीन ढेरे, राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे, डॉ. श्रुती कदम, डॉ. सोनल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस मित्रांनी जांभारी, सैतवडे, कचरे, आंबुवाडी, जयगड, चाफेरी, खंडाळा नाका आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील कोरोना चाचणीची भीती दूर झाली. गाव कोरोनामुक्त ठेवायचा असेल तर त्यासाठी सर्व ग्रामस्थांची चाचणी होणे गरजेचे असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवण्यात पोलीस मित्र यशस्वी झाले. एवढेच नव्हे तर हे पोलीस मित्र कोरोना चाचणी करून घेण्यासाठी स्वत: पुढे आले आणि ग्रामस्थांची करण्यासाठीही पुढे सरसावले. सर्व पोलीस मित्रांसोबत नागवेकर, दळी, विद्या मावळणकर, पूनम लाड, पूनम वासावे, रुग्णवाहिका चालक विनायक दुधवडकर, पोलीस सहाय्यक विनय मनवल तसेच सर्व होमगार्डस् यांची यासाठी विशेष मदत होत आहे.
नांदिवडे - कुणबीवाडी येथे ग्रामस्थांची नुकतीच कोरोना चाचणी घेण्यात आली. यावेळी वाटद गणाचे माजी सदस्य, नांदिवडेचे उपसरपंच विवेक सुर्वे, अमित गडदे, भरत भुवड, आशा सेविका संगीता बंडबे, वैभव घडशी, किरण बैकर, राजेश कासार, आदी उपस्थित होते.