नाखरेतील महिलेच्या मृत्यूचा पोलिसांनी लावला छडा, एकास घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:49 PM2022-02-08T14:49:13+5:302022-02-08T14:49:33+5:30
संशयित आरोपीच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने मृत महिलेने गाडीवरून उडी मारल्याने झाला होता मृत्यू
पावस : रत्नागिरी तालुक्यातील नाखरे - खांबडवाडी मार्गावर रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा छडा लावताना पाेलिसांनी अवघ्या दीड तासात दिगंबर सुधाकर शिंदे (३८, रा. मावळंगे, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर अपहरण आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील मनीषा मंगेश वारिशे (वय-३५) ही महिला नाखरे खांबडवाडी रस्त्यावर ३ फेब्रुवारी २०२२ राेजी सायंकाळी ६.१५ वाजता मृतावस्थेत पडलेली हाेती. याप्रकरणी पूर्णगड सागरी पाेलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली हाेती.
या प्रकरणाची दखल घेत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली हाेती. त्यानंतर त्यांनी पुढील तपासाच्या सूचना देत तपास पथक तयार करण्याचे आदेश दिले हाेते.
मनीषा वारिशे या दिगंबर शिंदे याच्या गाडीवरून जात हाेत्या. त्यांना काहीतरी संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडीवरून उडी मारली आणि त्यात गंभीर जखमी हाेऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिगंबर शिंदे तेथून निघून गेला. पाेलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०४, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी या घटनेच्या तपासासाठी पथके तयार करुन अवघ्या दीड तासात या प्रकरणाचा छडा लावला.