दहशतवादी हालचालींकडे पोलिसांची करडी नजर
By Admin | Published: January 6, 2017 10:58 PM2017-01-06T22:58:18+5:302017-01-06T22:58:18+5:30
पोलिस अधीक्षकांची माहिती : तबरेजचे मतपरिवर्तन परदेशात नाही, मुंब्रा येथेच झाले
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील हर्णे येथील तबरेज तांबे याच्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणपिढी अशा मार्गाकडे वळू नये यासाठी पोलिस सतर्क झाले असून, आवश्यक त्या ठिकाणी करडी नजर ठेवली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ‘इसिस’साठी काम करावे यासाठी मुंब्रा येथे असतानाच तबरेजचे मतपरिवर्तन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील गुन्हेगारीविषयक आढावा घेण्यासाठी प्रणय अशोक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. तबरेज तांबे याच्याप्रमाणे जिल्ह्यातील आणखी काही तरुण इसिसच्या संपर्कात आले आहेत का, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. प्रणय अशोक यांनी त्याचा इन्कार केला. जिल्ह्यात असे तरुण तयार होऊ नयेत यासाठी पोलिस सतर्क आहेत आणि सर्व घटनांवर, संभाव्य संशयास्पद भागांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील तबरेज तांबे याचे इसिस संघटनेशी संबंध असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा एटीएसच्या रडारवर आला होता. एटीएसचे एक पथक हर्णे येथे तळ ठोकून होते. त्यावेळी अनेक गोष्टी या पथकाच्या हाती लागल्या होत्या.
तबरेजचे मूळ गाव हर्णे असले तरी गेली अनेक वर्षे तो आपल्या आईवडिलांसमवेत मुंब्रा येथे राहत होता. तो परदेशात असतानाच त्याचे इसिसशी संबंध आले, अशी माहिती आधी समोर आली होती; पण आता त्याच्याशी निगडित बरीच माहिती पुढे येत आहे. मुंब्रा येथे असतानाच्या काळात त्याला इसिसकडे वळविण्यात आले होते. तसाच प्रभाव स्थानिक तरुणांवर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील तरुणपिढी कोणत्याही मोहात पडून इसिससारख्या संघटनांकडे आकर्षित होऊ नयेत, यासाठी पोलिस बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)