महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 07:37 PM2022-08-27T19:37:56+5:302022-08-27T19:39:04+5:30
महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर
तन्मय दाते
रत्नागिरी : महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर हाेणार आहे. मात्र, मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित हाेण्यासाठी पाेलीस प्रशासन सज्ज झाले असून, कशेडीपासून ते खारेपाटणच्या सीमा हद्दीपर्यंत महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे. विशेषत: परशुराम घाटात (ता. चिपळूण) विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर या वर्षी गणेशोत्सवावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी दाखल हाेणार असून, महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. पाेलिसांनी महामार्गावरील १३ ठिकाणे धाेकादायक म्हणून निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे.
तीन तपासणी नाके
जिल्हा वाहतूक पाेलिसांकडून महामार्गावर १८ छावण्या उभारण्यात येणार आहेत. तर भरणे, बहाद्दूरशेख नाका आणि पाली या ठिकाणी तीन तपासणी नाके ठेवण्यात येणार आहेत.
परशुराम घाट दक्ष
परशुराम घाट परिसरात आपत्कालीन यंत्रणा आणि २४ तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याशिवाय कशेडी घाट, चिपळूण शहरातून जाणारा महामार्ग, निवळी घाट, वेरळ घाटी या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
वाहतूक मदत केंद्र
महामार्गावर वाहतूक मदत केंद्र उभारण्यात येणार असून, गणेशोत्सव कालावधीत दिवस रात्री फिक्स पॉइंट आणि पेट्रोलिंग बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे ओळखून विशेष लक्ष दिले जाणार आहे.
ही धोकादायक ठिकाण
महामार्गावरील १३ धोकादायक ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये उधळे, भोस्ते, कशेडी, आवाशी, निवळी घाट, हातखंबा, वाकेड घाटवेरळ घाट, नावडी, गोळवली, दाभोळे, दख्खन वाटूळ घाट या ठिकाणांचा समावेश आहे.
सणासाठी येताना वाहतुकीचे नियम पाळा, रात्रीचा प्रवास टाळा, प्रवासात विश्रांती घ्या, लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा या मूलमंत्राचे पालन करावे. तसेच चालकाला पूर्ण विश्रांती द्या आणि वाहन सुरक्षित आहे का हे तपासूनच प्रवासाला निघाले पाहिजे. - शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक