दुचाकी अपघातात पोलीस ठार, अन्य एक गंभीर जखमी, डंपर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 03:21 PM2018-04-08T15:21:24+5:302018-04-08T15:21:24+5:30
नजीकच्या जालगाव येथे आज शनिवारी झालेल्या डंपर आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील पोलीस जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
दापोली - नजीकच्या जालगाव येथे आज शनिवारी झालेल्या डंपर आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील पोलीस जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कमलाकर शिकरे असे या ठार झालेल्या पोलिसाचे नाव असून, ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गुळवड गावचे आहेत. अपघातातील दोघेही पोलीस रत्नागिरीतील पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी येत होते.
पोलीस भरतीसाठी रविवारी रत्नागिरीत लेखी परीक्षा असल्याने बंदोबस्तासाठी शिकरे (२९) आणि त्यांचे पोलीस सहकारी उदय मोनये (२६, राजापूर) शनिवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास निघाले. दाभोळमार्गे जवळचा रस्ता असल्याने ते दाभोळ-जयगडमार्गे रत्नागिरीला जायला निघाले. अवघ्या पाच मिनिट अंतरावर जालगांव ग्रामपंचायतीच्या पुढे गेल्यावर समोरून येणाऱ्या डंपरला त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल लागले व त्यांची दुचाकी पुढे असलेल्या पिकअप व्हॅनवर जाऊन आदळली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रोडवर पडले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शिकरे यांना अतिरक्तस्राव झाला होता. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यरांचे सहकारी उदय मोनये यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. कमलाकर शिकरे यांच्या निधनाने दापोली पोलीस वसाहतीत शोककळा पसरली आहे. नाशिकहून त्यांचे कुटुंबीय दापोलीकडे येण्यासाठी निघाले आहेत. अपघाताची खबर डंपरचालक तुषार गुरव यांनी दिली आहे. दापोली पोलिसांनी डंपर (एमएच०८के/२०४२) ताब्यात घेतला आहे. नाशिकचे कमलाकर शिकरे वर्षभरापूर्वीच दापोली पोलीस स्थानकात आले आहेत. शिकरे यांच्या सोबत पत्नी व ७ महिन्याच्या दोन जुळ्या मुली दापोलीमध्ये राहत होत्या. गावाला त्यांची आई व वडील, विवाहीत बहीण असा परिवार आहे.