चिपळुणात सावकारांच्या कार्यालयांवर पोलिसांच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:22 AM2021-07-04T04:22:03+5:302021-07-04T04:22:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : सावकारीविरोधात येथील पोलीस व सहायक निबंधक कार्यालयाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दोन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : सावकारीविरोधात येथील पोलीस व सहायक निबंधक कार्यालयाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींच्या कार्यालयांत धाड टाकली व पोलीस तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व साहित्य जप्त केले आहे. याशिवाय पोलिसांनी सहायक निबंधक यांची भेट घेऊन याप्रकरणी पोलीस तपासाला प्रारंभ केला आहे. यामुळे शहर परिसरातील सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
सावकारी करताना ज्यादा रक्कम वसूल केल्याप्रकरणी पूजा मिरगल, चांगदेव खंडझोडे, शिवा खंडझोडे या तिघावर खंडणी मागितल्याप्रकरणी, तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमाप्रमाणे चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
येथील पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी शनिवारी गुन्हा दाखल झालेल्या दोन सावकारांच्या कार्यालयावर छापा टाकला व पोलीस तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी येथील सहायक निबंधक कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. याप्रकरणी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. पोलिसांकडून त्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. गुन्हा दाखल झालेल्या तिघांच्या कार्यालय व घराची तपासणी करण्यात आली. आवश्यक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
--------------------------
जप्त केलेले साहित्य परत करण्यास सुरुवात
सहायक निबंधक कार्यालय व चिपळूण पोलिसांनी सावकारीविरोधात मोहीम उघडण्यात आल्याने काही बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहे. लोकांकडून जबरदस्तीने जप्त केलेली वाहने व अन्य साहित्य काहींनी परत देण्यास सुरुवात केली आहे. खेर्डीमध्ये अशा पद्धतीने जप्त करून ठेवलेल्या दुचाकीही परत करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करणे जरूरीचे आहे.