पोलीसच धावले पोलिसांचे संसार वाचविण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:09+5:302021-08-18T04:37:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संकटाच्या वेळी स्वत:चे घर पाण्यात असताना दुसऱ्यांच्या मदतीला धावलेले चिपळुणातील पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : संकटाच्या वेळी स्वत:चे घर पाण्यात असताना दुसऱ्यांच्या मदतीला धावलेले चिपळुणातील पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला अख्खे पोलीस दल धावून आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पूरबाधित पोलीस आणि होमगार्डस् अशा ३१ जणांना रोख रक्कम, तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले.
जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आलेल्या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यामध्ये पोलीस दलातील २४ अमलदार व ७ होमगार्डस् यांचा संसारही पाण्याखाली गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांना मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जशी जमेल तशी मदत पोलीस खात्याकडे सुपूर्द केली. या मदतीमध्ये जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम देण्यात आली आहे. ही सर्व मदत स्वातंत्र्यदिनी चिपळूण येथे जाऊन त्या अंमलदारांना व होमगार्डस्ना सुपूर्द करण्यात आली.
या सर्व वस्तू देताना जिल्हा पोलीस अधीक्षकही भावुक झाले होते. तुमचे दु:ख खूप मोठे आहे. त्यातून सावरायला वेळ लागेल; पण आता हळूहळू सावरायला हवे. काहीही मदत लागली तरीही आवर्जून सांगा, अशा शब्दांत डाॅ. गर्ग यांनी त्या अंमलदारांना व होमगार्डस्ना धीर दिला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, देवेंद्र पोळ, जाधव, पोलीस उपनिरीक्षक समद बेग व अमलदार उपस्थित होते.
........................
अश्रू अनावर झाले
ज्या अंमलदारांची घरे पाण्याखाली गेली होती, अशांना जिल्हा पोलीस दलामार्फत मदत देण्यात आली तेव्हा ही मदत घेणाऱ्या अंमलदारांना अश्रू अनावर झाले होते. आमचे दुःख स्वतःचे मानून अशी तत्पर मदत करणारे आमचे कुटुंबप्रमुख पोलीस अधीक्षक आतापर्यंत आम्ही पाहिले नव्हते, असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले.