रस्त्याकडेला आढळलेल्या 'त्या' नवजात अर्भकाच्या आईचा पोलिसांनी घेतला शोध, संबंधित महिलेस घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:22 PM2022-01-04T19:22:53+5:302022-01-04T19:23:26+5:30
चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील एका दर्ग्याजवळ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ५ दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले होते. या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता.
चिपळूण : चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील एका दर्ग्याजवळ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ५ दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले होते. या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. तिन दिवसातच पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले आहे. या नवजात बालकाच्या आईचा पोलिसांनी शोध घेतला असून आज, मंगळवारी तिला ताब्यातही घेतले.
नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सुरु असतानाच गुहागर बायपास रस्त्यावरील दर्ग्याजवळ स्त्री जातीचे अर्भक एका तरूणाला आढळले होते. या अर्भकाला तत्काळ कामथे रूग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. त्यानतंर दुसऱ्या दिवशी पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात नेऊन बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार केले. सद्यस्थितीत या नवजात बालकाची प्रकृती सुस्थितीत आहे.
दुसरीकडे पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच तपासासाठी एका पथकाचीही नेमणूक केली होती. पोलिसांच्या या पथकातील पोलिस नाईक प्रणाली शिंदे यांना या बालकाच्या आई बाबतची काही गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार दोन दिवस पोलिस संबंधीत महिलेच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते.
त्यानुसार हे अर्भक संबंधीत महिलेचेच असल्याची खात्री पटताच मंगळवारी तिला ताब्यात घेतले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेचा तपास लावणाऱ्या पोलिस नाईक शिंदे यांच्या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.