पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:27 PM2020-09-10T18:27:44+5:302020-09-10T18:36:18+5:30

आंतराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणारे खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली. पोलिसांनी शहरापासूनच जवळ असणाऱ्या काजरघाटी येथे सापळा रचला. पोलिसांच्या सापळ्यात आठ संशयित अडकले आणि सुमारे २ कोटी ५० लाख रूपये किंमतीचे खवले मांजर व मांडूळ साप हस्तगत करण्यात यश आले.

Police set a trap and found the smugglers | पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले

पोलिसांनी सापळा रचला अन् तस्करी करणारे जाळ्यात सापडले

googlenewsNext
ठळक मुद्दे तस्करी करणारे आठही संशयित रत्नागिरीतील तरुण कोट्यवधी रुपये किमतीच्या वन्य प्राण्यांची तस्करी

रत्नागिरी : आंतराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणारे खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली. पोलिसांनी शहरापासूनच जवळ असणाऱ्या काजरघाटी येथे सापळा रचला. पोलिसांच्या सापळ्यात आठ संशयित अडकले आणि सुमारे २ कोटी ५० लाख रूपये किंमतीचे खवले मांजर व मांडूळ साप हस्तगत करण्यात यश आले.

बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास अनिल लाड यांना गुप्त बातमीदारामार्फत काही व्यक्ती खवले मांजर व मांडुळ जातीच्या सापाच्या तस्करी, विक्री करीता काजरघाटी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

पोलिसांचे तयार करण्यात आलेले पथक काजरघाटी परिसरात सापळा रचून बसले होते. त्याचवेळी समोरून चार दुचाकी येताना दिसल्या. या दुचाकीवरून येणाऱ्या संशयित व्यक्तींची पंचांसमक्ष तपासणी केली असता एमएच ०८, अयु ४१५१ या गाडीवर दोघेजण बसलेले होते. या गाडीच्या चालकाच्या फुटरेस्ट जवळ एका गोनपाटाच्या पिशवीत खवल्या मांजर होते. तसेच एमएच ०८, ओएम ५७६८ चे मागे बसलेल्या व्यक्तीच्या मांडीवर एका प्लास्टिक पिशवीत एक मांडुळ जातीचा साप असल्याचे मिळून आले.

या संशयितांची तपासणी केली असता सापडलेले प्राणी हे दुर्मीळ असून, आंतराष्ट्रीय बाजारात याची सुमारे २ कोटी ५० लाख रुपये किंमत असल्याचे पुढे आले आहे. यातील एक जिवंत खवले मांजर त्याचे वजन १४ किलो व लांबी ४.९ फूट आहे. तर एक जिवंत मांडुळ जातीचा साप, तपकिरी रंगाचा, त्यावर काळे ठिपके, त्याचे वजन ६०० ग्रॅम व लांबी २.६ फूट आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व संशयित हे तरुण आहेत. एकाच वेळी हे आठ संशयित पोलिसांच्या सापळ्यात अडकले असून, सर्वजण रत्नागिरी परिसरातील आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये रंजित सुरेंद्र सावंत (वय ३८, रा. झाडगाव नाका, रत्नागिरी), सुनील अनंत देवरुखकर (३४, रा. पोचरी, सोनारवाडी ता. संगमेश्वर), ओमकार राजेश लिंगायत (२४, रा. गुरववाडी, खानू मठ ता. लांजा), दीपक दिनकर इंगळे (२४, रा. कणगवली, पो. वेरक ता. लांजा), संदेश रामचंद्र मालगुंडकर (३९, रा. धामापूर धारेवाडी, ता. संगमेश्वर) दिनेश दत्ताराम मोंडे (२९, रा. आडिवरे, कालिकावाडी, ता. राजापूर, सध्या रा. कारवाचीवाडी, रत्नागिरी), प्रमोद वसंत कांबळे (३९, रा.कांबळेवाडी, कारवांचीवाडी, रत्नागिरी), लक्ष्मण बबन नाडे (४९, रा. धामणी, ता. संगमेश्वर) यांचा समावेश आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. अटक केलेल्या संशयितांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३०/२०२०, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ३९, ४४, ४८, ४८ अ, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Police set a trap and found the smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.