पोलिसांनी समाजाभिमुख व्हाव
By Admin | Published: February 12, 2015 11:54 PM2015-02-12T23:54:13+5:302015-02-13T00:55:07+5:30
कुलसचिव नारखेडे : कोकण कृषी विद्यापीठात सेवा प्रतिमा कार्यशाळा रंगलीे
दापोली : जनता व पोलीस यांच्यातील नाते वृध्दिंगत होऊन बदलत्या काळानुरुप पोलीस यंत्रणा समाजाभिमुख होणे काळाची गरज आहे, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नारखेडे यांनी व्यक्त केले.
कोकण कृषी विद्यापीठात दापोली, गुहागर, मंडणगड या तीन तालुक्यांतील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी ‘सेवा प्रतिमा एक गरज’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सिद्धेश नातू, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, दापोली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव, नवनाथ जगताप, शुभांगी म्हस्के उपस्थित होते.
जनतेच्या मनात पोलीस खात्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर व्हायला हवा. लोकांमध्ये खात्याची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी जनता व पोलीस यातील दरी कमी व्हायला हवी. संकटात माणूस देवाचा धावा करतो. देवाप्रमाणेच गुन्हा घडला की, संकटात त्यांना पोलीस स्टेशनचा रस्ताही दिसतो. त्यांच्या मनात देवाबद्दलची जी प्रतिमा आहे, त्यासारखीच प्रतिमा पोलिसांचीसुद्धा आहे. म्हणून पोलिसांचा धावा केला जातो. पोलिसांकडून न्याय मिळेल, असे वाटते. समाजाला चांगली सेवा दिल्यास जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा उंचावेल. समाज व पोलीस यांच्यातील नाते सुधारल्यास समाजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाची माहिती पोलिसांना मिळते. पोलीस हा आपला शत्रू नसून मित्र असल्याची खात्री पटते. जनता व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यास न्याय मागण्यांसाठी जनता पोलिसांकडे स्वत: येऊ लागतील. परंतु त्यासाठी चांगली सेवा मिळायला हवी. समाजात पोलिसांची प्रतिमा बदलायला हवी, असे ते म्हणाले.
समाज बदलतोय, त्याप्रमाणे पोलीसही बदलतोय. पूर्वी पोलिसांची चुकीची इमेज जनतेत निर्माण केली होती. बदलत्या काळात पोलिसांची इमेज समाजाभिमुख होत असून, जनता व पोलीस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले म्हणाले.
पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आभार मानले. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत पोलिसांचे ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. जनता व पोलीस यांचे नाते सुधारण्यावर भर देण्याचे शिकविण्यात आले. या कार्यशाळेला पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची मोठी उपस्थिती राहिली होती. (प्रतिनिधी)