राजकीय धूळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:36+5:302021-08-25T04:36:36+5:30
गेल्या दीड वर्षापूर्वी काेरोनाने शिरकाव केला. पहिली लाट काही काळ शमल्यानंतर मार्च २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या रूपातील विषाणूची दुसरी ...
गेल्या दीड वर्षापूर्वी काेरोनाने शिरकाव केला. पहिली लाट काही काळ शमल्यानंतर मार्च २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या रूपातील विषाणूची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेने हैदोस घालून लाखो नागरिकांना बाधित केले आणि पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने जीवही घेतले. कोरोनाकाळात संसर्ग रोखण्यासाठी नाइलाजाने लाॅकडाऊन करावे लागले. या काळात संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी घरातच रहावे म्हणून पोलीस यंत्रणा लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसांपासून रस्त्यावर अहोरात्र गस्त घालत आहेत. कोरोनाचे संकट असतानाच अपघात, नैसर्गिक आपत्ती यासारखी संकटे, मंत्री, लोकप्रतिनिधी यांचे दाैरे आदी सर्वच आघाड्यांवर ही यंत्रणा गुंतलेली आहे. आधीच या महत्त्वाच्या असणाऱ्या यंत्रणेत मनुष्यबळ कमी, त्यामुळे आहे त्यांच्यावरच अधिक ताण येत आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. त्यामुळेच सामान्य नागरिकांचे जीव कोरोनापासून वाचत आहेत.
मात्र, या संकटाबाबत राजकारणात फारसे कुणाला काही पडलेले दिसत नाही. कोरोना किंवा काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुराने चिपळूण, खेड या भागातील लोकांचे सर्वस्व वाहून नेले. मात्र, पाहायला आलेल्या राजकारण्यांमध्येसुद्धा श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे दाैरे उत्साहाने होत होते. आपत्तीने कोलमडून गेलेल्या लोकांच्या हातात जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली भीक दिल्यासारख्या वस्तू देऊन फोटोसेशन केले जात होते. हे सगळं चित्र मनात किळस निर्माण करणारे असेच होते.
सध्या राजकारणात जी काही बजबजपुरी माजली आहे, ती पाहात महाराष्ट्रातही बिहारसारखी राजकीय संस्कृती निर्माण व्हायला आता वेळ लागणार नाही, याचे संकेत मिळू लागले आहेत. यात सामान्य जनतेचे अस्तित्व विचारात घेतले जात असल्याचे दिसून येत नाही. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. नुकताच चिपळूण येथे आलेल्या महापुरानंतर अनेक मंत्र्यांचे, माजी मंत्र्यांचे दाैरे या भागात झाले, त्यावेळी या लोकांकडून व्यक्त झालेल्या तीव्र भावना हे याचे द्योतक आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे निदान आता तरी राजकारण्यांनी यातून काहीतरी शिकावं आणि राजकारणातील धूळफेक थांबवावी.