राजकीय सोयीची ‘मिसळ’
By admin | Published: January 22, 2016 11:54 PM2016-01-22T23:54:03+5:302016-01-23T00:46:51+5:30
सभापतींचा पक्ष कुठला : कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम
रत्नागिरी : गेल्या वर्षभरात जिल्ह्यात पक्षांतराचे पेवच फुटले आहे. एका पक्षातून निवडून आलेले लोक दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसण्याचा चमत्कार सध्या सातत्याने घडतो आहे. रत्नागिरी पंचायत समितीत शिवसेनेच्या पुढाकाराने सभापती झालेले महेश तथा बाबू म्हाप हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य. जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून शिक्षण समिती सभापती झालेले विलास चाळके हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य. या मिसळीमुळे सध्या कोण कोणत्या पक्षाचा याबाबत कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत.
जिल्हा परिषदेत शिवसेनेचे प्राबल्य असतानाही केवळ राजकीय स्वार्थासाठी तत्कालीन समाजकल्याण सभापती भगवान घाडगे यांना बाजूला करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या शीतल जाधव यांना राजापूर येथे एका कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश देऊन एका रात्रीत त्यांना समाजकल्याण सभापतीपद बहाल केले. त्याची किंमत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना मोजावी लागली. राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचेही तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेना आणि भाजपाचा तंबू गाठला आहे. त्यापैकी शिवसेनेच्या तंबूत गेलेले माजी आमदार सुभाष बने समर्थक विलास चाळके यांच्याही गळ्यात प्रवेशानंतर दुसऱ्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व वित्त सभापतीपदाची माळ घालण्यात आली. यावेळी इच्छुकांची संख्याही नेहमीप्रमाणेच होती.
रत्नागिरी पंचायत समितीमध्ये आमदार उदय सामंत समर्थक बाबू म्हाप सभापती झाले. ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर पंचायत समिती सदस्य झाले आणि शिवसेनेच्या पुढाकाराने पंचायत समिती सभापती झाले. ते आमचेच असल्याचा दावा आता राष्ट्रवादीने केला आहे.
शिवसेनेकडे सभापतीपदांसाठी उमेदवार असतानाही इतर पक्षांमधून आलेल्या सदस्यांना पुनर्वसनासाठी ही पदे देण्यात आली. राष्ट्रवादीच्या शीतल जाधव, बाबू म्हाप आणि काँग्रेसचे विलास चाळके यांनी शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला नाही. ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीत शिवसेनेचे प्राबल्य असतानाही राजकीय सोय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य आज सभापतीपदावर विराजमान आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत. (शहर वार्ताहर)
तोंड वेगवेगळ्या दिशेला : दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युती असली तरी आता दोघांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी तुझ्याविना करमेना..., अशी स्थिती आहे. मात्र, हे संबंध यापुढे असेच राहिल्यास त्याचा लाभ तिसऱ्यालाच होणार, हे आता सध्याच्या राजकारणावरून स्पष्ट झाले आहे.
कानामागून आली...
रत्नागिरी तालुक्यातील राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना मर्जीची पदे देण्याची किमया होऊ लागली आहे. त्यामुळे ‘काना मागून आले...’ अशीच तिखट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.