लांजात जुगार अड्ड्यावर धाड, बडे राजकीय पुढारी अडकले जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 07:10 PM2021-12-11T19:10:36+5:302021-12-11T19:11:58+5:30
राजकीय पुढारी अडकल्याने लांजा तालुक्यात जोरदार चर्चा
लांजा : तालुक्यातील कोर्ले तिठा येथील एका हॉटेलच्या मागील बाजूला रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत तीन पत्ते जुगार खेळणारे तेरा बडे राजकीय पुढारी जाळ्यात सापडले आहेत. पोलिसांनी याठिकाणाहून ४४,५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. काल, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार संजय कांबळे यांनी फिर्याद दिली असून, १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोर्ले येथील एका हॉटेलच्या मागील बाजूला रिकाम्या जागेमध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात तीन पत्ते खेळण्यात येत होता. याबाबत रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर साळवी, विजय आंबेकर, संजय कांबळे, चालक दत्तात्रय कांबळे तेथे दाखल झाले. पोलिसांनी धाड टाकताच जुगार खेळणाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी पूर्वनियोजित सापळा रचल्याने जुगार खेळणारे सर्वजण पोलिसांच्या तावडीत सापडले.
राजकीय पुढारी अडकल्याने लांजा तालुक्यात जोरदार चर्चा
जुगार खेळणारे प्रतिष्ठित राजकीय पुढारी असल्याने त्यांच्यावर पडलेल्या धाडीची भांबेड - कोर्ले विभागासह लांजा तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाली. गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईची कल्पना स्थानिक लांजा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे हे आपल्या पोलीस कर्मचारी यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरा पर्यंत पंचनामा केल्यानंतर लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. आज, शनिवारी ताब्यात घेतलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र रेवणे हे करीत आहेत.