चिपळुणात गणेशोत्सवानिमित्ताने राजकीय विरोधक एकत्र

By संदीप बांद्रे | Published: September 21, 2023 04:26 PM2023-09-21T16:26:38+5:302023-09-21T16:27:05+5:30

चिपळूण : अंतर्गत कलहामुळे राजकीय पक्ष फुटले आणि एकमेकांशी सख्य असणारे कार्यकर्ते एकमेकांपासून दुरावले. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांपासून ...

Political opponents gather on the occasion of Ganesh festival in Chiplun | चिपळुणात गणेशोत्सवानिमित्ताने राजकीय विरोधक एकत्र

चिपळुणात गणेशोत्सवानिमित्ताने राजकीय विरोधक एकत्र

googlenewsNext

चिपळूण : अंतर्गत कलहामुळे राजकीय पक्ष फुटले आणि एकमेकांशी सख्य असणारे कार्यकर्ते एकमेकांपासून दुरावले. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले हे पदाधिकारी एकत्र आल्याचे चित्र चिपळुणात पाहायला मिळत आहे. एकाच प्रकारच्या पोशाखात वावरताना हे कार्यकर्ते उत्सवात आनंदाने सहभागी झाले आहेत.

शिवसेनेत दोन गट पडले. कोणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ धरली, तर कुणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादीतही दोन गट पडले आणि काही उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर गेले तर काही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहिले. गटातटाच्या राजकारणात दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांपासून दूर गेले. हे सर्व कार्यकर्ते शहरातील वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय पदाधिकारी असल्याने ते मंडळातून बाहेर पडतील आणि दुसरे मंडळ स्थापन करतील, अशी शक्यता होती. परंतु, सर्व कार्यकर्ते पक्ष आणि राजकीय भेद विसरून एकत्र आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ठरवलेला पोशाख साऱ्यांनीच परिधान केल्याने सारे एकच भासत आहेत. वेगवेगळ्या पक्ष आणि गटात असलेले राजकीय कार्यकर्ते आता सार्वजनिक गणेश उत्सव मंडपात एकाच पोशाखात वावरत आहेत. गणेशाेत्सवाच्या निमित्ताने तरी सारे राजकारण विसरुन एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारे कार्यकर्ते धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करताना एकत्र येतात ही चिपळूणची संस्कृती आहे. ती यापुढेही कायम राहील. यावर्षीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम आहे.- शशिकांत मोदी, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.
 

चिपळूण शहरातील नागरिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी राजकारण व मतभेद विसरून एकत्र येतात. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळ उपक्रम राबवतात आणि त्यासाठी सर्वजण एकत्र येतात, हेच चिपळूणचे वैशिष्ट्य आहे. - आशिष खातू, शहर अध्यक्ष भाजप.

चिपळुणातील कोणताही सण शांततेत व गडबड गोंधळ न होता साजरा केला जातो. त्यामध्ये सर्वसमाजाचे लोक व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्तेही एकदिलाने एकत्र येतात. हीच चिपळूणची संस्कृती असून, त्याचा प्रत्यय प्रत्येक सणात येत असतो. - लियाकत शाह, शहराध्यक्ष काँग्रेस.

चिपळूण शहराने नेहमीच सलोख्याची संस्कृती जपली आहे. नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीतही अनेकांच्या भूमिकेत सलोखा दिसला. गणेशोत्सवात कधीही राजकारण अथवा हेवेदाव्याला थारा दिला जात नाही. - मिलिंद कापडी, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट).

Web Title: Political opponents gather on the occasion of Ganesh festival in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.